अवकाळी पावसाच्या महापालिका प्रेसरुममध्ये बरसती धारा
इमारतीतील पत्रकार कक्षात बरसू लागल्या पाऊसधारा
नवी मुंबई : सोमवारी सकाळपासुन सुरू झालेल्या अवकाळी पावसात नवी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या असतानाच नवी मुंबई महापालिकेच्या ताजमहालरुपी इमारतीला देखील गळती लागल्याचे दिसून आले. महापालिका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पत्रकार कक्षात साक्षात पाऊस धाराच बरसून पाणी साचण्याचा प्रकार घडला. त्यामुळे महापालिका मुख्यालय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीबीडी, बेलापूर येथील सेक्टर १५ ए, भूखंड क्र. १ येथे महापालिकेच्या मुख्यालयासाठी सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये ठेकेदाराने इमारतीचे बांधकाम पूर्ण करून पालिकेकडे हस्तांतरण केल्यानंतर पालिकेचे कामकाज या नविन इमारतीतून सुरू करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला ग्रीन बिल्डींगचे गोल्ड मानांकन देखील मिळाले आहे. जुलै २०१८ मध्ये देखील तिसऱया मजल्यावरील प्रशासन विभागात तसेच इमारतीच्या पाचव्या माळ्यावर असलेले सभागृह व सातव्या माळ्यावर असलेली प्रेक्षक गॅलरी आणि पत्रकार गॅलरीलासुध्दा गळती लागली होती.
सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या अलिशान इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही मुख्यालय इमारतीत दरवर्षी पावसाळ्यात गळती सत्र सुरूच राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी, महापालिकेद्वारा शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत देखिल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महापालिकेद्वारा तातडीने दुरुस्ती
दरम्यान, महापालिका इमारतीमधील पत्रकार कक्षात पाऊस धारा बरसू लागल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच महापालिका प्रशासनाने सदर गळतीची गंभीर दखल घेत तातडीने गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या अवकाळी पावसात मुख्यालयात आणखी इतर कोणत्या विभागात गळती सुरु आहे का याची तपासणी प्रशासनातर्फे केली जात आहे.