गणेशोत्सवात 63.695 टन निर्माल्य संकलन
नवी मुंबई : 27 ऑगस्टपासून अत्यंत उत्साहात संपन्न झालेला श्रीगणेशोत्सव नवी मुंबईकर नागरिकांनी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करावा अशा केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद देत पर्यावरणशील दृष्टीने साजरा केला. यामध्ये शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांना 'पर्यावरणमित्र' म्हणून प्रशस्तिपत्र देउुन गौरविण्यात आले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखून नागरिकांनी मोठया संख्येने 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेशमूर्तींचे 143 इतक्या मोठ्या संख्येने विभागवार बनविलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करुन पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी योगदान दिले.
त्याचप्रमाणे श्रीमूर्तीसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे या आवाहनालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. श्रीगणेशोत्सवातील चार विसर्जन दिवसांमध्ये 22 नैसर्गिक व 143 कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात 63 टन 695 किलो इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र निर्माल्य वाहतुक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
गणेशोत्सवात श्रीमुर्तीसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे 'ओले निर्माल्य' तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे 'सुके निर्माल्य' ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत गौरींसह सातव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी सर्वाधिक 24.440 टन तसेच दीड दिवसांच्या विसर्जनदिनी 14.205 टन निर्माल्य आणि अनंतचतुर्दशीदिनी दहाव्या दिवसाच्या विसर्जनप्रसंगी 14.070 टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पाचव्या दिवाशी 10.980 टन निर्माल्य संकलीत झाले. अशाप्रकारे संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत एकूण 63.695 टन इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनाव्दारे तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे. यामधून उद्याने फुलविली जाणार आहेत.
याशिवाय डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने धारण तलाव, कोपरखैरणे याठिकाणी त्या स्थळावरचे तसेच कोपरी व महापेगाव तलाव येथील फुलांच्या पाकळ्यांचे निर्माल्य आणले जाऊन निर्माल्यापासून खतनिर्मिती कार्यवाही करण्यात येत आहे.
पर्यावरणशील दृष्टीकोन जपून त्याची प्रत्यक्ष कृतीशील अंमलबजावणी करण्यात नवी मुंबईकर नागरिक नेहमीच सक्रिय सहभागी होत असतात. अशाचप्रकारे गणेशोत्सवातही नागरिकांचा पर्यावरणपूरक सहभाग लाभला असून संकलित झालेल्या निर्माल्यापासून करण्यात येणारी खतनिर्मिती हा त्या पर्यावरणशीलतेचाच एक भाग आहे.