वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मतदार याद्यांतील ‘घोळ' विकोपाला
अंबरनाथः अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील गोंधळामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यादीतील गंभीर चुकांमुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडी (शिवसेना-उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) आणि ‘मनसे'च्या नेत्यांनी या घोळाला जबाबदार असलेल्या नगरपालिका अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मनसे शहर अध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह ‘महाविकास आघाडी'च्या शिष्टमंडळाने यासंदर्भात अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली होती. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्यानंतर ‘निवडणूक आयोग'ने मुदतवाढही दिली. मात्र, या हरकतींचा योग्य निपटारा न करताच ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतही ‘अभूतपूर्व' गोंधळ कायम राहिल्याचे उघड झाले आहे. सदर घोळ केवळ तांत्रिक त्रुटी नसून, तो जाणूनबुजून ठराविक व्यक्तींना फायदा पोहोचवण्यासाठी घडवून आणला गेला असल्याचा थेट आरोप नेत्यांनी केला आहे.
या अंतिम यादीत समोर आलेल्या चुका अत्यंत गंभीर असून, त्यांनी मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला आहे. याद्यांमध्ये दुबार नावांची मोठ्या प्रमाणावर नोंद आढळली. उल्हासनगर महापालिकेतील माजी नगरसेवक आणि माजी महापौर यांचीही नावे अंबरनाथच्या यादीत दिसली. अंबरनाथ पूर्वेकडील मतदारांची नावे पश्चिमेत आणि पश्चिमेकडील मतदारांची नावे पूर्वेकडील प्रभागात टाकण्यात आली. एका प्रभागातील मतदारांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात दिसली. अनेक नावे अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर नोंद झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे ‘काँग्रेस'चे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचे नाव माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वॉर्डात गेल्याने राजकीय वर्तुळात या गोंधळाची जोरदार चर्चा रंगली आहे.
याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनीही ‘याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला आहे' अशी कबुली दिली असून, या गोंधळाची पडताळणी सुरु असल्याचे आणि ‘राज्य निवडणूक आयोग'लाही याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती ‘मनसे'चे शैलेश शिर्के यांनी निवेदनात नमूद केली दिली. परंतु, या कबुलीवर नेते समाधानी नाहीत. ‘मनसे'चे शैलेश शिर्के, ‘काँग्रेस'चे प्रदीप पाटील, ‘शिवसेना (उबाठा)'चे अजित काळे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट'चे सलीम खान यांनी सदर निवेदनाद्वारे, या गोंधळासाठी जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने रितसर गुन्हे दाखल करण्याची आणि योग्य तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार यादी पुन्हा तपासून, सर्व दोष दुरुस्त करुनच ‘सुधारित अंतिम यादी' जाहीर करण्यात यावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
या संदर्भात अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.