भिवंडी-वाडा रस्त्याची दुरवस्था; ‘भाजपा'चा रास्ता रोको
भिवंडी : भिवंडी-वाडा रस्त्याची दुरवस्था मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवासी चाकरमानी, विद्यार्थी यांच्यासाठी मनस्ताप देणारी ठरलेली आहे. या विरोधात अनेक आंदोलन होऊन देखील येथील भ्रष्ट ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने १ जुलै रोजी सत्ताधारी ‘भारतीय जनता पार्टी'चे उत्तर मंडळ अध्यक्ष नीलेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली अनगांव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सुमारे तासभर सुरु राहिलेल्या या आंदोलनात ग्रामीण भाजपा पदाधिकारी पी. के. म्हात्रे, रामनाथ पाटील, शांताराम पाटील, गुरुनाथ जाधव, महिला अध्यक्षा रविना जाधव, नमिता गुरव, यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर या आंदोलनामुळे या मार्गावरील दोन्ही बाजुस लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश बच्छाव यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
केंद्रात आणि राज्यात ‘भाजपा'चे सरकार सत्तेवर असताना भिवंडी तालुक्यातील मुख्य रस्त्यांची विशेषतः भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ‘भाजपा'ला आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी भाजपा सरकारने ८८१ कोटीचा निधी दिला, त्याचे भूमीपुजनही झाले. परंतु, दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्ट अधिकारी आणि ठेकदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम केले. अनेक अपघात झाले, ज्यामध्ये ८१ जणांचा जीव गेला. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्याने आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे सांगत येथील भ्रष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची ‘विधान परिषद'मध्ये घोषणा झाली. त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी असल्याचे भाजपा मंडळ अध्यक्ष नीलेश गुरव यांनी सांगितले.