महिला मृत्यू प्रकरणी ‘केडीएमसी'ची कारवाई
कल्याण : कल्याण येथील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात ५ मे रोजी उपचाराकरिता आलेल्या सविता गोविंद बिरादार या ४३ वर्षीय महिलेचा वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने ४ जण निलंबित तसेच वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई केली आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखील सदर घटनेबाबत खुलासा मागवण्यात आला आहे.
केडीएमसी प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सदर महिला रुग्ण वेळेवर स्थलांतरीत झाली असती तर त्यांना वेळेवर उपचार चालू झाले असते आणि त्यांचा जीव वाचू शकला असता. असा निष्कर्ष झाल्यामुळे रुग्णलयातील सिस्टर इनचार्ज जयश्री रायकर, वाहन चालक प्रमोद लासुरे, मारुती निकम आणि हरिश्चंद्र यशवंतराव यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच बाह्य संस्थेमार्फत नियुक्त असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेर पटेल आणि परिचारिका नमिता भोये यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात ५ मे रोजी दुपारी १.१५ वाजता सविता बिरादार महिला डाव्या हातामध्ये अशक्तपणा अशी तक्रार घेऊन अपघात कक्षात उपचाराकरिता दाखल झाली होती. यावेळी रुग्णालयातील अपघात कक्ष विभागात बाह्य संस्थेमार्फत नियुक्त असणारे डॉ.उमेर पटेल यांनी तिलाा तपासले. सेरिब्रो व्हॅस्क्युलर ॲक्सीडेंटची शक्यता वाटल्यामुळे त्यांनी बिरादार यांना रुक्मिणीबाई रुग्णालयातील तज्ञ फिजिशियन डॉ. निशिकांत शर्मा यांच्याकडे पाठवले. फिजिशियन डॉ.शर्मा यांनी सविता बिरादार यांना तपासल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालय किंवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन पुढील उपचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार संदर्भ चिट्ठी दुपारी २ वाजता देण्यात आली होती. रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी असलेले शुल्क भरण्याबाबत सूचित केले असता त्यांनी शासनाच्या १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागवण्याचा प्रयत्न केला. १०८ क्रमांकावरुन मदतीची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अपघात कक्षातील ऑन ड्युटी स्टाफ नर्स कोमल दिघे, नमिता भोये आणि सिस्टर इन्चार्ज जयश्री रायकर यांनी ऑनड्युटी वाहन चालक यांना दुपारी २.१५ वाजता रुग्णाबाबत कळवले होते. परंतु, प्रत्यक्षात ३.१० वाजता रुग्णवाहिका रुग्णाला स्थलांतरीत करण्याकरिता उपलब्ध झाली.
यादरम्यान सविता बिरादार यांची तब्येत खालावली. त्यामुळे पुन्हा त्यांना अपघात कक्षामध्ये आणण्यात आले. दरम्यान वाहन चालक मारुती निकम रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी घेऊन गेले. अपघात कक्षामध्ये कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर यांनी रुग्णाला तपासले असता रुग्णाचे पल्स रेट व रक्तदाब मोजता येत नव्हता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ Cardiopulmonary Resususcitation चालू केले आणि रुग्णाला Ing. Atropime, Ing.Adrenaline ऑक्सीजन देण्यात आले. तरीही रुग्णाचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर बिरादार यांचा दुपारी ३.४५ वाजता मृत्यू झाला.
सदर घटनेची प्राथमिक चौकशी वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात आली असून प्राथमिक चौकशी अहवालात रुग्णवाहिका चालक हरिश्चंद्र यशवंतराव, प्रमोद लासुरे यांनी कर्तव्यावर उपस्थित असताना रुग्णवाहिकेतून रुग्णाला स्थलांतरीत करण्यामध्ये दिरंगाई केल्याचे आणि मारुती निकम यांनी रुग्णवाहिका अनावश्यकरित्या डिझेल भरण्यासाठी घेऊन गेल्यामुळे त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले. तसेच अपघात कक्षातील परिचारिका नमिता भोये, सिस्टर इन्चार्ज जयश्री रायकर यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना सदर रुग्ण स्थलांतरीत झाले नसल्याची माहिती दिली नाही.तर डॉ. उमेर पटेल यांनी रुग्णाला स्थलांतरीत करण्यासाठी संबंधित वाहन चालकाकडे पाठपुरावाही केला नाही किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनाही अवगत केले नाही.