कोव्हीड वाढता प्रादुर्भाव : पनवेल महापालिका सज्ज
पनवेल : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. या संदर्भात आयुक्त चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यावेळी आयुवतांनी निर्देश दिले.
सदर बैठकीस उपायुक्त डॉ. वैभव विधाते, आरोग्य-स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये आयुक्त चितळे यांनी कोव्हीड संदर्भातील सद्यस्थितीचा, उपलब्ध सोया-सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कोव्हीड करिता सज्ज होण्यासाठी सूचन दिल्या. त्यानुसार महापालिकेने आपली तयारी पूर्ण केली आहे.
महत्वपूर्ण तयारी कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी वायएमटी कॉलेजच्या निमिशा रुग्णालयात १०० खाटांचे सीसीसी विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच कळंबोली डीसीएच येथे ३३० ऑक्सिजन बेडस् आणि ६ आयसीयू बेड तयार ठेवण्यात आले आहेत. यामधील ऑक्सिजनचे सिलेंडर, पाईपलाईन यांची तपासणी तसेच सर्व उपकरणांची दुरुस्ती पुनर्तपासणी आयुक्त चितळे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे ५० खाटा आरक्षित करण्याबाबत आणि एमजीएम रुग्णालयामध्ये ५० खाटा आरक्षित ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यानुसार संबंधित रुग्णालयांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अशाप्रकारे किमान २०० ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा असणाऱ्या खाटा सुसज्ज करण्यात आल्या आहेत.
पनवेल महापालिकेच्या मोल एक्स्पर्ट या आरटीपीसीआर लॅब मध्ये दररोज १५०० आरटीपीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असणारी यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. याकरिता आवश्यक रसायने उपलब्ध करण्यात आली आहेत. कोव्हीडचा प्रादुर्भाव वाढल्यास आवश्यक ट्रसिंग, टेस्टिंगकरिता विशेष पथके तसेच डीसीएच, सीसीसी सेंटर येथे आवश्यक टेक्निकल मनुष्यबळ (डॉक्टर नर्सेस) आदि तयार ठेवण्यात आले आहे.
रुग्णालयात आयसीयू आणि ऑक्सिजनचे पेशंट वाढल्यास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत देखील संपर्क करुन मुबलक ऑक्सिजन पुरवठा होण्याबाबत दक्षता घेतली आहे. सीसीसी सेंटरकरिता आवश्यक रुग्णांचे जेवण, खाटा, अंथरुण, पांघरूण तसेच दैनिक वापराचे साहित्य उपलब्ध करण्याकरिता भांडार विभाग सुसज्ज ठेवण्यात आला आहे.
सर्व यंत्रणा कार्यान्वित डीटीएच आणि सीसीसीमध्ये रुग्णांकरिता आवश्यक औषधसाठा तयार ठेवण्याबाबत आयुक्तांनी आदेशित केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पूर्वी ‘कोव्हिड रुग्णालय' म्हणून काम केलेल्या सर्व खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधून इच्छुक कोव्हीड समर्पित रुग्णालयांसाठीची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच आवश्यकता पडल्यास पूर्वीच्या कोव्हीड लाटेतील कार्यरत रुग्णालयांना तातडीने सज्ज राहण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत.
पनवेल कनेक्ट...
पनवेल महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या ५ ॲम्बुलन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खाजगी ॲम्बुलन्स सेवा, शासनाची १०४ क्रमांकाची ॲम्बुलन्स यांचे नंबर पनवेल कनेक्ट या महापालिकेच्या ॲपवर प्रसारित करण्यात आले आहे जेणेकरुन आपत्मकालीन परिस्थितीमध्ये रुग्ण ॲपद्वारे रुग्णवाहिकेशी तातडीने संपर्क साधू शकेल.
२४७ कॉल सेंटर..
पनवेल महापालिकेचे २४७ कॉल सेंटर कार्यान्वित करण्याबाबत करण्यात आले आहे .
महापालिकेकडे असणारे ऑक्सिजनचे एलएमओ आणि पीएसए प्लॅन्ट तपासणी करून तातडीने कार्यान्वित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालय आणि लॅब यांना कोव्हीड रुग्णाबाबत तातडीने माहिती देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालय तसेच महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आयएलआय आणि साथीच्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच क्षेत्रनिहाय कुठे साथीचे आजार बळावत असतील तर त्यावर विशेष लक्ष ठेवण्याबाबत सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
एकूणच सर्व प्रकारच्या दक्षता घेत पनवेल महापालिकेने कोव्हीडचा मुकाबला करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.