आपत्ती व्यवस्थापन संदर्भात समन्वयाने काम पहावे
पनवेल : पावसाळी कालावधीत आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सहकार्याने आणि समन्वयाने काम पहावे. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी येथे दिले आहेत. आपत्ती निवारण संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी केशव शिंदे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मंगला माळवे, स्वरुप खारगे, अभिजीत पराडकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, शहर अभियंता संजय कटेकर, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सुबोध ठाणेकर, विभाग प्रमुख, इतर अधिकारी, सिडको अधिकारी, आयआरबी प्रतिनिधी, आदि उपस्थित होते.
सी-१ प्रकारातील इमारती रिकाम्या करण्याबाबत पोलीस विभागाने सहकार्य करावे. तसेच सिडको नोडमधील धोकादायक इमारतीमधील वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत, गटारामधील वीज केबल काढून घेण्याबाबत वीज वितरण विभागाने सहकार्य करण्याबाबत आयुक्त चितळे यांनी वीज वितरण विभागास सूचित केले. त्याचप्रमाणे गाढी नदीतील भरावामुळे पूर येण्याची संभावना असल्याकारणाने लवकरात लवकर नदीमधील भराव काढण्याबाबत सिडको प्राधिकरणास सूचित केले.
तसेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पाऊसावेळी पांडवकडा भागात अनधिकृतरित्या तरुणांनी जाऊ नये यासाठी सिडको आणि पोलीस बंदोबस्त करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही आयुवत चितळे यांनी सूचित केले.
पावसाळ्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कळंबोलीमधील एसटीपी प्लॅन्टमध्ये अधिकचे पंप सुरू ठेवावेत. त्यांची दुरुस्ती करून ठेवण्याबाबत आयुवतांनी संबंधितांना सूचित केले.
याचबरोबर बस स्टॅन्ड मधील होर्डिंग स्ट्रक्चरचे ऑडीट करुन घ्यावे. काही दुर्घटना होणार नाही याबाबत दक्ष राहून काळजी घ्यावी, अशा सूचना ‘एसटी'च्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच बस स्टॅन्ड परिसरातील खड्डे भरण्याबाबत, हायवेवरील रस्त्यावर पडणारे पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याबाबत आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ‘जिल्हा परिषद'च्या नादुरूस्त शाळा पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून घ्याव्यात. ज्या शाळांच्या इमारती धोकादायक आहे, त्या इमारती बांधकाम विभागास पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. साथरोगासारखे विकार उद्भवल्यास तयारीच्या दृष्टीने औषधसाठा आणि इतर वैद्यकिय सेवा-सुविधांची पूर्तता करण्याबाबत वैद्यकिय आरोग्य विभागास आयुक्त चितळे यांनी सांगितले.