नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक करिता आरक्षण सोडत संपन्न
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण निश्चिती व सोडत 11 नोव्हेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहामध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली सुव्यवस्थित रितीने पार पडली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, निवडणूक विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य लेखा परीक्षक राजेंद्र गाडेकर, उपायुक्त संजय शिंदे, संघरत्ना खिल्लारे, ललिता बाबर, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता 4 चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित केली आहे. त्यानुसार 111 सदस्यसंख्येकरिता 28 प्रभाग असून त्यामधील 27 प्रभाग हे चार सदस्यीय व 1 प्रभाग तीन सदस्यीय झालेला आहे. 4 सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक असून त्यामध्ये आरक्षण निश्चित करताना नियम देण्यात आले आहेत. हे नियम उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत ही आरक्षण सोडत प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
राज्य निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या प्रभागातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित केले असून त्यानुसार 10 प्रभागातील जागा हया अनुसूचित जाती व 2 प्रभागातील जागा या अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 111 जागांच्या 27% प्रमाणात 29 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या एकूण 111 सदस्यांपैकी एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा कमी नाही म्हणजेच 56 महिला सदस्य असतील व प्रत्येक प्रभागात किमान 2 महिला सदस्य असणे आवश्यक आहे हे लक्षात घेत महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले.