इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी यूनियनच्या बैठकीअगोदरच महापालिकेने घेतले निर्णय
नवी मुंबई : महापालिका मुख्यालयात अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अन्याय जाणून घेण्यासाठी अनुसूचित जमाती कल्याण समिती १० सप्टेंबर रोजी कामगार संघटनांसमवेत बैठक घेणार होती. या बैठकीचे महाराष्ट्र कर्मचारी युनियनलाही निमंत्रण होते. या बैठकीत महाराष्ट्र कर्मचारी युनियन अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील अन्यायाचा पाढा वाचणार हे लक्षात आल्याने महापालिका प्रशासनाने युनियनच्या अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱी व अधिकाऱ्यांच्या समस्या व अन्यायाचे बैठकीपूर्वीच निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने युनियनच्या भितीने समस्या मार्गी लागल्या असल्याची मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांत चर्चा सुरु झाली आहे.
महापालिका प्रशासनाकडे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. समस्या सोडविण्यासाठी व कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी पाठपुरावा करत होते. बुधवारी महापालिका मुख्यालयात येत असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीपुढे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नावासह महापालिका प्रशासनाकडून अनुसूचित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला महाराष्ट्र कर्मचारी युनियन वाचा फोडणार हे लक्षात येताच आपली नाचक्की टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील अधिकारी दिनेश धोंडू गवारी यांना तातडीने पदोन्नती देण्यात आली. विशेष म्हणजे अनुसूचित जमाती कल्याण समितीपुढे बोलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेळही देण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनेला भूमिका मांडणे शक्य झाले नाही. तरीही महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड यांनी अनुसुचित जमाती कल्याण समितीस निवेदन सादर करताना अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होत असलेला अन्याय निदर्शनास आणून दिला.
अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय जाती जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीची वेळ आल्यावर प्रशासन कोणतेही निकष लावून पदोन्नती कशी डावलते? अन्य महापालिकांमध्ये न्याय मिळत असताना नवी मुंबई महापालिका प्रशासन कशाप्रकारे हेकेखोरपणाची भूमिका मांडत कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवते याबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.