रस्ता सुरक्षा संदर्भात यंत्रणांनी सतर्क रहावे

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा संदर्भात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून, ‘मिशन मोड'वर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. डी. एस.स्वामी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, आदि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती-नियोजन, अवजड वाहतूक नियंत्रण-नियोजन आणि पर्यायी मार्गाची आखणी, अपघतांची संख्या कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षासंदर्भात करावयाच्या कार्यवाही याबाबतचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉट आणि व्हलनरेबल स्पॉटच्या ठिकाणी सर्व संबंधित विभागांनी मनुष्यबळ उपलब्ध करावे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करावे. रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरावेत. वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. गणपती आगमन आणि विर्सजनाच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी घालावी. ज्या-ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते ती लोकेशन्स निश्चित करुन ट्रॅफिक कमी करण्यासाठी नियोजन करावे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जिथे आवश्यक असेल तिथे अतिरिक्त साहित्य उपलब्ध करुन ठेवावे. कमीत कमी वेळेत मदत पोहोचवावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी ड्युटी चार्ट तयार करुन मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे,अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मृत्युनंतरही यातना संपेना!