सफाई कामगार ६ महिने पगारापासून वंचित
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत येथे कार्यरत सफाई कर्मचारी ६ महिने वेतनापासून वंचित आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करुनही वेतन प्रश्नाची तसेच ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराची वरिष्ठांकडून कोणतीही चौकशी होऊन कारवाई केली जात नसल्याने ‘महाराष्ट्र निर्माण सेना कामगार संघटना'चे भिवंडी युनिट अध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली १३ ऑगस्ट रोजी भिवंडी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात ‘मनसे विद्यार्थी सेना'चे ठाणे ग्रामीण अध्यक्ष परेश चौधरी यांच्यासह मनसे पदाधिकारी, सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. कामगारांचे थकीत ६ महिन्यांचे वेतन तत्काळ द्यावे, २५ महिन्यांचा पीएफ परस्पर ग्रामपंचायतने हडप केला आहे. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. तत्कालीन ग्रामसविका यांनी अनधिकृतपणे ३९५ मालमत्तांवर घरपट्टी लावून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचे चौकशीत स्पष्ट होऊन देखील कारवाई होत नसल्याने संतोष साळवी यांनी संताप व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे ग्रामसेविका साक्षी शिंदे यांच्याकडे खोणी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार होता. त्यांची ३१ मे रोजी बदली झाली असताना येथे नियुक्त असलेले ग्रामसेवक सादिक शेख यांना ७० दिवसानंतरही पदभार सोपविलेला नाही. ग्रामपंचायत मधील अंतर्गत वादामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. मालमत्ता कराचे जमा होणारे पैसे इतरत्र खर्च करुन कामगारांवर उपासमारीची वेळ आणली असल्याचा आरोप संतोष साळवी यांनी केला आहे.
दरम्यान, जर प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन बेमुदत सुरु ठेवण्याचा इशारा साळवी यांनी शेवटी दिला आहे.