मोकाट कुत्र्यांचा सुरक्षा रक्षकावर हल्ला
खारघर : स्पॅगेटी सोसायटीत सुरक्षा रक्षकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पनवेल महापालिकेने सोसायटी मधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे आणि काही खाजगी रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे सोसायटीच्या सदस्यांना जखमी सुरक्षा रक्षकावर अपोलो रुग्णालयात उपचार करुन घ्यावे लागले.
एप्रिल महिन्यात तळोजा मधील आसावरी सोसायटीत आद्या सिंग (४ वर्ष) तर मे महिन्यात खारघर, सेक्टर-१० मध्ये सायकलिंगसाठी जात असताना रंजीत जोगी नामक व्यक्तीवर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता १जून रोजी सकाळी ९च्या सुमारास स्पॅगेटी मधील पारिजात या सोसायटीत कर्तव्यावर असलेल्या नौशाद आलम या सुरक्षा रक्षकांवर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत त्याच्या तोंडावर, गालावर आणि पायावर चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पारिजात सोसायटीमध्ये मोकाट कुत्रा सोसायटीत सफाई कामगार असलेल्या महिलेच्या दिशेने धावून गेला. यावेळी सदर महिलेने मदतीसाठी जोरात आरडा-ओरड केल्याने तेथे कार्यरत असलेले सुरक्षा राक्षक नौशाद आलम तिच्या मदतीसाठी धावून आला. तोच या मोकाट कुत्र्यांने याच सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. मोकाट कुत्र्याने सुरक्षा रक्षकाला खाली पाडून त्याच्या गालावर, तोंडावर तसेच पायावर चावा घेतला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा जबडा फाटल्याचे निदर्शनास आम्ही त्याला महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात घेवून गेलो; पण रविवार सुट्टी असल्यामुळे ते बंद होते. सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसल्यामुळे अखेर या सुरक्षा सरक्षकावर अपोलो रुग्णालयात उपचार करावे लागले, अशी माहिती सोसायटीतील रहिवाशी विशाल वाघमारे यांनी सांगितले.
सदर कुत्र्यांना पकडून केंद्रात आणले आहे. सुरक्षा रक्षकास कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती प्राप्त होताच त्या सुरक्षा राक्षकाला उपचारासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे, अशी सूचना केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेकडून नियमितपणे मोकाट कुत्र्यांचे लसीकरण केले जात आहे.
-डॉ. बी. एन. गिते, श्वान निर्बिजीकरण विभागप्रमुख, पनवेल महापालिका.
रविवार सुट्टीच्या दिवशी महापालिकेचे आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे सोसायटीच्या सदस्यांना नौशाद आलम या सुरक्षा राक्षकावर खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. खारघर मध्ये २ आरोग्य केंद्र आहेत. सुट्टीच्या दिवशी २ पैकी एक रुग्णालय सुरु करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
-अमर उपाध्याय, पदाधिकारी, भाजपा.