पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट कार्यशाळा उत्साहात संपन्न

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती-जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय-मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारितेची पाठशाळा-बातमी मागची गोष्ट' या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळा ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडली. पत्रकारिता क्षेत्रात ज्ञानवृध्दी आणि संवाद साधण्याच्या हेतुने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दै. ठाणे वैभवचे संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यशाळेस ठाणे महापालिका उपायुक्त (माहिती-जनसंपर्क) उमेश बिरारी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती'चे सदस्य कैलास म्हापदी, ‘ठाणे जिल्हा पत्रकार संघ'चे अध्यक्ष संजय पितळे, ‘कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती'चे अध्यक्ष मनोज जालनावाला, ‘ठाणे पत्रकार संघ'चे अध्यक्ष दिपक सोनावणे, ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ'चे अध्यक्ष आनंद कांबळे, ‘ठाणे डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना'चे अध्यक्ष प्रफुल वाघोले, ‘ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन'चे अध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्य प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये ऑर्गोनॉमिक्स प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि प्रेरणादायी वक्त्या डॉ. मोना पंकज यांनी दैनंदिन कामकाज आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'चे निवृत्त संचालक तथा ‘न्यूज स्टोरी टुडे' पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या विविध योजना, प्रसारमाध्यमे आणि शासकीय अधिकाऱ्यांची परस्परपूरक भूमिका, कर्तव्य-जबाबदारी याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारिता याची सांगड कशाप्रकारे घालता येवू शकेल याविषयीचे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक भाषणात, ‘कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती'चे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती पत्रिकेबाबत थोडक्यात माहिती देत, शासन निर्णयानुसार सर्व पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावेत. तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन केले.

उपायुक्त उमेश बिरारी यांनी अशा कार्यशाळा पत्रकारांना नव्या दृष्टीकोनात विचार करण्यास प्रेरणा देतात, असे सांगून सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कैलास म्हापदी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करीत बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनांबाबत माहिती दिली. पात्र पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. संजय पितळे यांनी शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अटी सुलभ करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सदर कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार, संपादक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. कार्यशाळा पत्रकारांसाठी केवळ माहितीपर नव्हे तर व्यावसायिक दृष्टीकोनातून तसेच शासन-प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील सकारात्मक संबंध वृध्दींगत होण्यास उपयुक्त ठरली. पत्रकारितेतील नव्या वाटा शोधण्यासाठी ‘पाठशाळा' महत्त्वपूर्ण ठरली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न पुतळा