बंगलापाडा आदिवासी पाड्यातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खारबाव रेल्वे स्थानकाजवळील बंगला पाडा परिसरात ४० घरांची वस्ती असलेल्या आदिवासी पाड्यावर आजही रस्त्यासह ग्रामस्थांना मुलभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे. या भागात रस्ता नसल्यामुळे नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी दररोज दिवा-वसई रेल्वेमार्गावरील रुळ ओलांडून तर कधी रस्त्यात आडव्या उभ्या असलेल्या मालगाडी खालून जीवघेणा प्रवास करीत आहेत.
रेल्वे फाटक किंवा सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्यामुळे थेट रेल्वे रुळ ओलांडण्याची नामुष्की बंगला पाडा परिसरातील नागरिकांसह शाळकरी मुलांवर येऊन ठेपली आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. या प्रवासाचा व्हिडिओ स्थानिकांनी व्हायरल केला आहे. पावसाळ्यात रेल्वे पुलाखाली पाणी जमा होत आहे. तर कॉरिडॉर रेल्वे मार्गाचे काम सुरु असल्याने तो मार्गही बंद असतो. त्यामुळे वाहनांसाठीही रस्ता नसल्यामुळे आजारी व्यक्तींनाही उचलून रुळ ओलांडून घेऊन जावे लागत आहे.
गावकऱ्यांची रेल्वेखालून भुयारी मार्ग अथवा फुट ओव्हर ब्रिज उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थ महिला हर्षदा चौधरी यांनी केली आहे. याबाबत खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याशी संपर्क साधला असता या गावच्या समस्येबाबत माहिती मिळाल्यानंतर तत्काळ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देऊन येथील समस्या सोडवणुकीसाठी मागणी केल्याची माहिती खा. सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.