अवघ्या १२ दिवसात ३,०६७ शेतकऱ्यांचे पंचनामे
कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून युध्द पातळीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती ‘कल्याण'चे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पावसामुळे भात पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरवला गेला. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून युध्दपातळीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४० तलाठ्यांसह ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम, महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी असे ९० अधिकारी कर्मचारी यांनी अवघ्या १२ दिवसात तालुक्यातील एकूण ३,०६७ शेतकऱ्यांचे पंचनामे केले.
८७ हेवटर भात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे आणि याद्या तयार झाल्या असून शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले.