वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओवे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्रदान
उरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले बी. टी. ओवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘पोलीस पदक' जाहीर केलेले असून सदर पोलीस पदक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. २९ जुलै रोजी रोजी राजभवन येथे सदर कार्यक्रम पार पडला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. टी. ओवे १९९६ रोजी ‘महाराष्ट्र लोकसेेवा आयोग'मार्फत सरळसेवेने महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर भरती झाले. त्यांनी महाराष्ट्र पोलीस ॲकॅडमी, नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयातील देवनार पोलीस ठाणे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष-मुंबई, ट्रॉम्बे पोलीस ठाणे, विशेष सुरक्षा विभाग-मुंबई, पोलीस प्रशिक्षण केंद्र-मरोळ, फोर्स वन-मुंबई येथे कार्यरत असताना गुंड, गुन्हेगार आणि अंमली पदार्थ विक्री करणारे गुन्हेगार यांचा पर्दाफाश करुन चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत तळोजा वाहतूक शाखा येथे चांगले कर्तव्य बजावले आहे.
सध्या बी. टी. ओवे न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे प्रभारी म्हणून कर्तव्य करीत आहेत. बी. टी. ओवे यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी म्हणून सचोटीने केलेल्या चांगल्या आणि उल्लेखनीय कामगिरीकरिता त्यांना वरिष्ठांकडून उत्तेजनार्थ अनेक बक्षिसे मिळालेली आहेत. या पुरस्काराबद्दल न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओवे यांचे अभिनंदन केले आहे.