विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा वाढला आकडा
वसई : विरार मधील चार मजली रमाबाई अपार्टमेंट इमारत २६ ऑगस्ट रोजी रात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. अवघे १५ वर्षे जुनी इमारत कशी कोसळली, याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
२७ ऑगस्ट रोजी ढिगाऱ्यामध्ये २० ते २५ जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही शोध कार्य सुरु आहे. रमाबाई इमारत अरुंद गल्लीत असल्याने तेथे रेस्क्यू वाहन आणि रुग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने ‘एनडीआरएफ'च्या टीमला मॅन्यूअली रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे शोध कार्याला उशीर झाला. परिणामी, अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा मागील भाग कोसळला आहे. याप्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या वतीने तक्रार दाखल होताच पोलिसांनी संबंधित बिल्डरला अटक केली आहे. या दुर्घटनेत आरोही ओंकार जोविल (२४), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (२६), दिनेश प्रकाश सपकाळ (४३), सुप्रिया निवलकर (३८), अर्णब निवलकर (११), पार्वती सपकाळ अशा ७ मृतांची ओळख पटली आहे.