अनेक जिल्ह्यामध्ये अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी; बदली न करता निवडणूक प्रक्रियेला बाधा
धोकादायक इमारतीत महापालिकेचे कार्यालय
डोंबिवली : डोंबिवली मधील कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक इमारतीत असूनही याच इमारतीत अजुनही जन्म-मृत्यू दाखला कार्यालय सुरु आहे. त्यामुळे या कार्यालयात दररोज दाखला घेण्याकरिता नागरिकांची गर्दी असते. मात्र, सदर कार्यालय अन्य ठिकाणी हलविण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसते. कार्यालयातील कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या जीव धोक्यात का घालत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालयात ‘ग' प्रभाग क्षेत्र कार्यालय काही वर्षांपूर्वी तुकारामनगर येथील ‘फ'प्रभाग क्षेत्र कार्यालय जवळील पी. पी. चेंबर येथे हलविण्यात आले. डोंबिवली उपायुक्त कार्यालय, नागरिक सुविधा केंद्र, पाणी पुरवठा विभाग, मलः निस्सारण विभाग, उद्यान विभाग यासह अनेक कार्यालये इतर ठिकाणी नेण्यात आली आहेत. महापालिकेचे विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक इमारत जाहीर केल्याने महापालिका प्रशासन तत्परता दाखवत या सर्व विभागातील कार्यालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केली. असे असले तरी याच धोकादायक इमारतीत अजुनही जन्म-मृत्यू दाखला कार्यालय सुरु आहे. सदर कार्यालय दुसऱ्या ठिकाणी अद्याप हलविण्यात आले नसल्याने येथील कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात का टाकला जात आहे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, नाईलाजास्तव नागरिकांना जीव मुठीत घेऊन या धोकादायक इमारतीत यावे लागते, असे काही नागरिकांनी सांगितले.