आग्रोळी येथील समाज मंदिराची दुरवस्था
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मार्फत आग्रोळी गावालगत उड्डाणपुलाखाली बांधण्यात आलेल्या समाज मंदिराची पुरती दुरवस्था झाली असून, समाज मंदिराच्या दुरवस्थेची लवकरात लवकर पहाणी करुन समाज मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी आग्रोळी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबई महापालिकाच्या माध्यमातून आग्रोळी गावालगत उड्डाणपुलाखाली बांधण्यात आलेल्या समाज मंदिराची सध्या दुरवस्था झाली असून, विविध सामुदायिक कार्यक्रमांसाठी महापालिका बेलापूर विभाग कार्यालय मार्फत सदर समाज मंदिराच्या वापरासाठी शुल्क आकारले जाते. परंतु, या समाज मंदिराच्या देखभाल-दुरुस्तीकडे संबंधित महापालिका विभाग अधिकारी लक्ष देत नसून, वेळोवेळी त्यांच्याकडून समाज मंदिर सभागृहाची पाहणी देखील केली जात नाही, असे सुधीर पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणले आहे.
आग्रोळी गावातील समाज मंदिराच्या खिडक्यांचे लोखंडी ग्रिल तसेच स्लायडिंगच्या काचा फुटल्या असून, मुख्य दरवाजा देखील खराब झाला आहे. समाज मंदिराच्या आतील बाजूच्या भितींचे रंगकाम, तळ भागातील फरशी, प्रसाधनगृह तसेच छताची देखील दुरवस्था झाली आहे. नागरिकांना समाज मंदिराच्या वापरापोटी भाडे आकारल्यानंतर समाज मंदिराच्या साफसफाईची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असूनही सदर संपूर्ण साफसफाईचा अतिरिक्त खर्च भाडे भरणाऱ्याला करावा लागत आहे. समाज मंदिराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या समाज मंदिराच्या भिंतीवर येणारे-जाणारे लघुशंका करतात. त्यामुळे सदर परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे, असे निवदेनात अधोरेखित करुन, ‘आग्राळी गावातील महापालिका समाज मंदिराच्या दुरवस्थेची लवकरात लवकर पहाणी करुन, योग्य ती स्थापत्य विषयक कामे करुन सदर समाज मंदिर नागरिकांच्या नित्य वापरासाठी सुशोभित आणि स्वच्छ ठेवण्याचे आदेश संबंधित महापालिका विभाग अधिकाऱ्यांना द्यावेत', अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर गोरखनाथ पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आग्रोळी गावातील समाज मंदिराच्या वापराचे शुल्क आकारण्यापलिकडे महापालिकेचे समाज मंदिराकडे लक्ष नाही तसेच विभाग कार्यालयाचे देखील काही घेणे देणे नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.समाज मंदिराची पाहणी केल्यास त्वरित दुरुस्ती करण्याची अनेक कामे समाज मंदिरात निदर्शनास येतील.या सभागृहाच्या दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर प्राधान्याने होईल, अशी अपेक्षा आहे. - सुधीर गोरखनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते - आग्रोळी, नवी मुंबई.