नवी मुंबईत चेन स्नॅचिंग टोळीचा धुमाकूळ; दोन तासात तीन महिलांचे १३ लाखांचे दागिने लुटले
नवी मुंबई : नवी मुंबईत चैन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारुंच्या कारवाया सुरूच असून या लुटारूंनी बुधवारी रात्री अवघ्या दोन तासांमध्ये वाशी, नेरुळ आणि महापे भागातील तीन महिलांच्या अंगावरील तब्बल १३ लाख २२ हजार रुपये किमतीचे दागिने लुटून नेले आहेत. त्यामुळे महिला वर्गात या लुटारुंची दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या लुटारूंनी वाशी रेल्वे स्टेशन जवळून मोटारसायकल चोरून हे तिन्ही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. चैन स्नॅचिंग करणारे हे लुटारू काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले, तरी बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने या लुटारूंचा शोध घेण्यासाठी पोलिसासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या प्रकरणातील दोघा लुटारूंनी बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वे स्टेशन जवळून प्रथम मोटारसायकल चोरली. त्यानंतर त्यांनी त्याच मोटारसायकलवरून वाशी सेक्टर १२ मध्ये जाऊन शगुन सोसायटी समोर रिक्षामधून उतरलेल्या पद्मा संतोष चेपुरी (५२) यांच्या गळ्यातील ५ लाख रुपये किंमतीचे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र खेचून पलायन केले. यावेळी पद्मा चेपुरी यांनी आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत दोघे लुटारू पसार झाले.
त्यानंतर या लुटारूंनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नेरुळ मधील सारसोळे गावात मच्छिमार्केट जवळ कांदा बटाटा विकत घेत असलेल्या छाया काशिनाथ कोयंडे (५२) या महिलेच्या गळयातील ३ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन खेचुन पलायन केले.
या घटनेनंतर सदर लुटारूंनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महापे येथील एमबीपी बसस्टॉपवर तिसरी चेन स्नॅचिंग केली. डोंबीवली येथे जाण्यासाठी तेथील बसस्टॉपवर उभ्या असलेल्या उषा सुरेश चौगुले (५४) यांच्या समोर मोटरसायकल आडवी लावुन त्यांच्या गळ्यातील ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ४ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तसेच १ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे दिड ताळे वजनाचे मंगळसुत्र असे एकूण ५ लाख २२ हजार रुपये किमतीचे दागिने खेचुन पलायन केले.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने लुटारूंचा शोध घेण्यात अडचणी
चेन स्नॅचिंग करणाऱ्या या लुटारूंनी अवघ्या दोन तासांमध्ये तीन महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेल्यानंतर पोलिसांनी या लुटारूंचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पामबीच मार्ग, महापे तसेच इतर ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहे. त्यामुळे या लुटारूंचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.