नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी
नगरपालिकेच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या पश्चिमेकडील आरोग्य केंद्राची सध्या दुरवस्था झाली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या केंद्रात पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयासाठी पाण्याची सोय नाही. यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आरोग्य केंद्रात पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पैशाने पाणी विकत घेऊन प्यावे लागते. तसेच स्वच्छतागृहासाठीही पाणी बाहेरुनच आणावे लागते. यामुळे विशेषतः महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी नसल्याने रुग्णांची तपासणी करतानाही अडचणी येतात. म्हणून हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा लागतो, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.
आरोग्य केंद्राच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना या घाणीतूनच वाट काढावी लागते. रात्रीच्या वेळी येथे गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर असल्याने दारुच्या बाटल्या आणि इतर कचरा सर्वत्र पडलेला असतो.
या आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेमुळे सुमारे २० हजार नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी बबलू खान यांनी केली. आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी ५० लाख रुपये खर्च केले असतानाही, जर येथे मूलभूत सुविधा नसतील तर नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा कशा मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अंबरनाथ नगरपालिकेचे अभियंता विनोद राठोड यांनी या समस्येची दखल घेतली असून, आरोग्य केंद्रातील सर्व असुविधा लवकरच दूर केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.