‘श्रमजीवी'च्या रास्ता रोको आंदोलनाला यश
भिवंडी: भिवंडी-वाडा-मनोर आणि खारबाव-कामण-चिंचोटी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ‘श्रमजीवी संघटना'ेने २६ जून रोजी पुकारलेले अभूतपूर्व रास्तारोको आंदोलन रात्री १२ वाजता जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. भिवंडी-वाडा आणि अंजूरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात ‘श्रमजीवी संघटना'ेने २६ जून रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील कवाड नाका, नांदीठणे, अंबाडी नाका, मालोडी, वसई तालुक्यात चिंचोटी, कामण तर वाडा तालुक्यातब कुडूस, डाकिवली फाटा, शिरीष पाडा, खंडेश्वरी नाका अशा ९ ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. या सर्व ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनात शेकडो स्त्री-पुरुष यांच्यासह नागरिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.
जोपर्यंत आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा घ्ोत आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी जेवणासाठी चुली मांडल्या होत्या. ज्यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आंदोलनाचे नेतृत्व करणारे ‘श्रमजीवी'चे पदाधिकारी दत्तात्रय कोलेकर, बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सिता घाटाळ, सुनील लोणे आणि पुजा माळी यांना अंबाडी येथे चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'चे अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील, वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे पाटील, जव्हार उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे, भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी जवळपास ७ तास चर्चा केली.
त्यानंतर अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांनी आंदोलनकर्त्यांसमोर येत ‘श्रमजीवी संघटना'च्या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाने घ्ोतली असून, ठाणे जिल्हाधिकारी यांच्यावर या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कृती आराखडा तयार करुन उद्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. तसेच ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याच्या ‘विधान परिषद'मधील आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रात्री १२ वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.