कळवा भागातील अवैध धंद्यांवर त्वरित बंदी घालण्याची मागणी
ठाणे : कळवा (पूर्व) भागातील विनापरवाना चालू असलेली दारु दुकाने आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा'चे ठाणे शहर सचिव तथा कळवा रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य हनुमंता राम शिंगे यांनी ठाणे पोलीस आयुक्त, ‘कळवा पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळवा (पूर्व) परिसरातील विशेषतः वाघोबा नगर, भास्कर नगर, शिवाजीनगर, शांतीनगर, पौंड पाडा, भोलानगर आणि त्यालगतच्या परिसरात विनापरवाना अवैध दारु विक्री करणारी दुकाने आणि जुगार खेळविण्याचे अड्डे खुलेआम चालू आहेत. या अवैध धंद्यांमुळे परिसरात सामाजिक आणि नैतिक ढासळ घडत असून, तरुण पिढी यामध्ये अडकत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, महिला, वृध्द आणि लहान मुलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळा, धार्मिक स्थळे यांपासून १५० मीटर अंतराच्या आत दारु व्रिकी दुकाने, जुगार अड्डे, पानटपऱ्या राजरोसपणे चालू आहेत. याविषयी अनेक वेळा सोशल मीडिया, द्विटरच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे या निवेदनात हनुमंता शिंगे यांनी अधोरेखित केले आहे.
कळवा (पूर्व) भागातील अवैध धंद्यांवर त्वरित बंदी घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात या भागात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य परत घडू नये यासाठी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. - हनुमंता राम शिंगे, सचिव - ठाणे शहर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा.