नागरिकांना मालमत्ता ओळखपत्र

नवी मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांची महापालिकेशी संबंधित कामे सुलभतेने व्हावीत याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष आहे. यादृष्टीने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेबाबतची सविस्तर माहिती देणारे ‘मालमत्ता ओळखपत्र' उपलब्ध करून देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त तथा कर विभागप्रमुख डॉ. राहुल गेठे यांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत महापालिका मुख्यालयातील ध्वजारोहणानंतर करण्यात आला. अशाप्रकारे मालमत्ता धारकांना ‘मालमत्ता ओळखपत्र' उपलब्ध करुन देणारी नवी मुंबई देशातील पहिलीच महापालिका आहे.

या मालमत्ता ओळखपत्राचा लाभ शहरातील ३.५ लाख मालमत्ता धारकांना होणार असून त्यांना आपल्या मालमत्तेबाबतची मालमत्ता क्रमांक, पत्ता, क्षेत्रफळ, कर तपशील अशी सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी या पॅनकार्डसारख्या कार्डद्वारे उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते ५ मालमत्ता धारकांना प्रातिनिधिक स्वरुपात मालमत्ता ओळखपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा कर विभागप्रमुख डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर विभागप्रमुख तसेच मालमत्ताकर विभागाच्या सहा. आयुक्त अलका महापूरकर आणि अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्ड स्वरुपातील ओळखपत्राद्वारे मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता कराची थकबाकी, आगाऊ भरलेला कर रक्कम सहजपणे पाहता येते. तसेच सदर ओळखपत्र घेऊन मालमत्ता धारक थेट नागरी सुविधा केंद्रावर जाऊन कर भरु शकतात. या मालमत्ता ओळखपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच आधारकार्डाप्रमाणे मालमत्तेचे अधिकृत ओळखपत्र म्हणूनही वापरता येईल.

या मालमत्ता ओळखपत्रामुळे मालमत्तेची विक्री, हस्तांतरण आदिंसाठी मालमत्तेची ओळख आणि पडताळणी सोपी होईल. तसेच यामुळे मालमत्ता धारकांना मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधताना होणाऱ्या श्रम, वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.

सुशिक्षितांचे शहर अशी देखील ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील तंत्रस्नेही नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा जास्तीत जास्त डिजीटलायझेशनवर भर आहे. त्यादृष्टीने महत्वाचा असणारा मालमत्ता ओळखपत्राचा उपक्रम मालमत्ता कर विभागातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविणारा आहे. नागरिकांना मालमत्ता ओळखपत्र उपलब्ध करुन देणारी देशातील पहिली महापालिका असा लाभणारा नावलौकिक नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारा आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गडकरी रंगायतन'मध्ये पुन्हा घणाणली तिसरी घंटा