तंत्रज्ञानाद्वारे भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडवणे शक्य - आ. रईस शेख
भिवंडी : सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड दिली तर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या नक्की सोडवण्यात यश मिळू शकते, असे प्रतिपादन आमदार रईस शेख यांनी केले आहे.
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वंजारपट्टी नाका ते कल्याण नाका अशा महापालिका प्रशासनासह करीत असलेली सर्वेक्षणानंतर आमदार शेख बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्यासह महापालिका अधिकारी ,स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडी शहरातील नागरिक सदैव वाहतूक कोंडीमुळे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे त्रस्त असतात. त्यावर महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना, शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीस कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील त्यामध्ये हवा तेवढा बदल दिसून येत नसल्याने आमदार रईस शेख यांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडवणुकीसाठी मुंबई येथील वाहतूक कोंडी संदर्भात काम करणाऱ्या डब्ल्यू.आर.एम. या संस्थेची मदत घेतली आहे.
१३ सप्टेंबर रोजी आ. रईस शेख, महापालिका आयुक्त अनमोल सागर, संस्था प्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांच्या सोबत वंजारपट्टी नाका ते कल्याण नाका परिसरातील रस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करीत वाहतूक कोंडीच्या सोडवणुकीसाठी उपाययोजनांकरिता प्रयत्न केला आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असून त्यासाठी आम्ही मुंबई येथील संस्थेची मदत घेतलेली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यात सर्वांच्या प्रयत्नातून यश मिळेल. त्यासाठी महापालिका प्रशासन आयुक्त सहकार्य करीत असल्याबद्दल आमदार रईस शेख यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाहतूक कोंडी एका दिवसात कमी होणार नाही. त्यासाठी आम्ही सर्वेक्षण करुन कोणकोणते बदल करता येणे शक्य आहे, त्याची पडताळणी केली आहे. शहरात अतिक्रमण समस्या मोठी असली तरीसुध्दा रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी फक्त अतिक्रमणामुळे नव्हे तर रस्त्यावरील वाहन संख्या वाढीमुळे सुध्दा होत आहे. वाहतूक कोंडी सोडवत असतानाच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुध्दा यापुढे अधिक तीव्र केली जाणार असल्याचे आयुक्त सागर यांनी स्पष्ट केले.