ड्रोन फिरल्याच्या अफवेने घबराट
कल्याण : ९ मे रोजी रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्करी विमाने आणि ड्रोन हवेत पाडले. कल्याण-डोंबिवली मधील नागरिक विविध टीव्ही चॅनेलवर युध्दाची दृश्ये पाहत असताना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात आकाशात ३ ड्रोन फिरत असल्याची अफवा पसरली. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर शक्तिशाली हवाई हल्ला केला. त्याचे टीव्ही चॅनेल्सवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. सीमेवर होणाऱ्या सायरनच्या भयावह आवाजांमुळे लोकांच्या हृदयाचे ठोके जलद झाले आहेत. भारताने प्रत्युत्तरात पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. युध्दामुळे उत्तर भारतातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. नागरिक सर्व दृश्य पाहत आहेत.
दरम्यान, मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या आधारवाडी परिसरातील नागरिकांना आकाशात ३ ड्रोन फिरताना दिसले. अनेक नागरिक घराबाहेर पडले आणि त्यांनी आकाशात ड्रोनची हालचाल पाहिली. काही जागरुक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजार पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या संदर्भात पोलीस उपायुवत अतुल झेंडे यांनी एक निवेदन जारी केले. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. एक विमान कमी उंचीवर उड्डाण करत होते, तर इतर २ विमान इच्छित स्थळी उड्डाण करत होती. नागरिकांनी त्यांना ड्रोन समजून पोलिसांना माहिती देण्यासाठी ११२ वर फोन केला. तथापि, ड्रोनची बातमी केवळ अफवा होती.