पनवेलकर नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास वाढता प्रतिसाद

पनवेल ः गेल्या काही दिवसापासून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरण्याकडे प्रतिसाद वाढला असून रोज सुमारे ३-४ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत होत आहे. पनवेल महापालिकेच्या कर संकलनाचा मागील वर्षाचा विक्रम मोडल्यानंतर दररोज या उच्चांकांमध्ये वाढ होत असून नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढू लागला आहे.

या आधी १९ मार्च रोजी महापालिकेने मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढत उच्चांकी ३७० कोटी रुपयांची वसुली केली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी ३.३४ कोटींचा भरणा झाला असून आता या आर्थिक वर्षामधील एकूण ३७६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात ‘मालमत्ता कर संकलन-कर आकारणी विभाग'तर्फे तयार करण्यात आलेल्या विविध जप्ती आणि अटकावणी पथकाच्या माध्यमातून वेगाने कारवाई केली जात आहे. परिणामी, महापालिका मालमत्ताकर वसुलीचा रोज एक विक्रम करत आहे. तसेच ‘तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' आणि इतर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने महापालिकेचे बळ वाढले असून, महापालिका आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या सुचनेनुसार थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या आदेशनुसार मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर प्रत्येक विभागातील वसुली पथक कारवाई करीत आहे. कर अधीक्षक महेश गायकवाड तसेच कर अधिक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाच्या माध्यमातून चारही प्रभागातून उच्चांकी वसुली  केली जात आहे.

दरम्यान, मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिका तर्फे सातत्याने करण्यात येत आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने  'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ' तयार केले आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे.

तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास१८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आगीमुळे नेरुळ एमआयडीसीतील शुभदा पॉलिमर्स कंपनी जळून खाक