रबाळे एमआयडीसीतील फार्मास्युटीकल कंपनी आगीत जळुन खाक

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील जेल फार्मास्युटिकल कंपनीत शुक्रवारी  पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी, या आगीत संपुर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ तासांच्या प्रयत्ना नंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर दुपारपर्यंत या ठिकाणी कुलिंगचे काम सुरु होते.  

ठाणे बेलापूर औदयोगिक वसाहतीतील रबाळे एमआयडीसीतील आर-952 वर असलेल्या जेल फार्मास्युटीकल या कंपनीमध्ये पावारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने त्यावेळी कंपनी एकही कामगार नव्हता. कंपनीमध्ये मोठ्या  प्रमाणात  ज्वालाग्रही रासायनिक पदार्थ असल्याने आग लागल्यानंतर या रासायनिक पदार्थामुळे आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले. त्यामुळे काही वेळातच आग सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीची व्याफ्ती मोठी असल्याने त्याठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी, कोपरखैरणे, ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ब्रँन्टो स्कायलिफ्ट गाडीचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 8 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास येथील आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर जवानांकडुन सायंकाळपर्यंत कुलिंगचे काम सुरु होते. या कंपनीमध्ये लागलेल्या आगी मागचे कारण अद्याप समोर आले नसले, तरी शॉर्ट शर्किटमुळे सदर कंपनीत आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सदर कंपनी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस सज्ज