नेरुळ मधील ४ भूखंडांना आजवरची सर्वाधिक बोली
नवी मुंबई : नवी मुंबई शहरामधील भूखंडांचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सानपाडा, नेरुळ, ऐरोली, घणसोली, वाशी, बेलापूर, खारघर मधील ‘सिडको'च्या काही मोक्याच्या भूखंडांना जास्त रवकमेची बोली प्राप्त झालेली आहे. ‘सिडको'चे भूखंड घेण्यासाठी विकासकांमध्ये स्पर्धा लागलेली असून या स्पर्धेमुळेच ‘सिडको'च्या नेरुळ मधील भूखंडासाठी आजवरची सर्वात जास्त बोली मिळाली आहे. पामबीच मार्गालगत नेरुळ, सेक्टर-२८ (फेज-२) मधील भूखंड क्र.१२ए, १२ बी, १२ सी आणि १२ डी या चार भूखंडांना प्रति चौरस मीटर अनुक्रमे ६.४५ लाख, ६.८५ लाख, ७.६५ लाख आणि ७.३० लाख रुपये असा दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ४ भूखंडांच्या विक्रीतून ‘सिडको'ला जवळपास १५०० कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. दरम्यान, यापूर्वी ‘सिडको'च्या सानपाडामधील भूखंडाला ५.५४ लाख रुपये प्रति चौरस मीटरचा दर प्राप्त झाला होता.
सिडको महामंडळाने नेरुळ, सेक्टर-२८ (फेज-२) मधील भूखंड क्र.१२ए (६३५२.४२ चौ.मी.), १२ बी (५३५०.३५ चौ.मी.), १२ सी (५००६.५० चौ.मी.) आणि १२ डी (४५८६.९० चौ.मी.) असे चार भूखंड विक्रीकरिता उपलब्ध केले आहेत. प्रयोजनासाठी राखीव असणाऱ्या या भूखंडांसाठी १.५ एफएसआय आणि या सर्व भूखंडांसाठी ‘सिडको'ने ३.२६ लाख प्रति चौरस मीटर अशी आधारभूत किंमत निश्चित केली होती. त्याअनुषंगाने इच्छुक खरेदीदारांकडून मार्केटींग विभाग एमएम-१ अंतर्गत बोली मागविण्यात आल्या होत्या. नेरुळ, सेक्टर-२८ मधील सदर भूखंड विक्रीसाठी विकासकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला असून इच्छुक भूखंड खरेदीदारांनी लावलेल्या बोली ‘सिडको'कडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार नेरुळ सदर सर्व चारही भूखंडांना पार्थ अर्बनस्पेस प्रा. लि. या विकासक कंपनीने सर्वात जास्त बोली लावल्याचे आणि सदर चारही भूखंड विकत घेण्यासाठी पार्थ कंपनी पात्र झाल्याचे ‘सिडको'कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पार्थ अर्बनस्पेस कंपनीने १२ ए भूखंडासाठी ४११ कोटी, १२ बी भूखंडासाठी ३६७ कोटी, भूखंड क्र.१२ सी साठी ३८२ कोटी तर भूखंड क्र. १२ डी करिता ३३४ कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे आता या भूखंड विक्रीतून ‘सिडको'ला जवळपास १५०० कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, नेरुळ मधील भूखंडाला मिळालेला ७ लाख ६५ हजार रुपये प्रति चौरस मीटर दर नवी मुंबईमधील आजवरचा सर्वात जास्त भूखंड विक्री दर ठरला आहे. यातून ‘सिडको'ला जवळपास १५०० कोटींचा महसूल मिळणार आहे. तर यापूर्वी सानपाडा मधील भूखंडासाठी ५ लाख ५४ हजार ०८९ रुपये प्रति चौरस मीटर दराची बोली लागली होती.
या संदर्भात ‘सिडको'च्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नेरुळ, सेक्टर-२८ मधील ‘सिडको'च्या ४ भूखंडांना आजवरचा सर्वाधिक दर प्राप्त झाल्याचे सांगितले.
सदरचे वास्तव बाजारपेठेतील एक प्रकारे सट्टाच म्हणावा लागेल. नेरुळ सेक्टर-१३ मधील भूखंडाला मिळालेल्या दराच्या तुलनेत सेक्टर-२८ मधील भूखंडांना मिळालेले दर यामध्ये खूपच तफावत आहे. ज्यामुळे जमिनीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत असून भूखंड जास्त किंमतीत खरेदी करण्याऐवजी व्यावहारिक किंमतीत खरेदी केले पाहिजेत, असे वाटते.
-राजेश प्रजापती, बांधकाम व्यायसायिक.