नवी मुंबईच्या राजाला भावपूर्ण निरोप
नवी मुंबई : शिवछाया मित्र मंडळ आयोजित नवसाला पावणाऱ्या, नवी मुंबईच्या राजाला काल अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. नेत्रदीपक रोषणाईने सजलेला ट्रक, त्यात विराजमान झालेला नवी मुंबईचा राजा, वाद्यांची मंगल धून, राजावर होणारी भाविकांची पुष्यवृष्टी आणि मोरया मोरयाचा जयघोष सारेच नवी मुंबईकरांचे लक्ष्य वेधून घेत होते.
मुसळधार पावसातही विविध जाती धर्माचे हजारो गणेश भक्त मोठ्या भक्ती भावाने या विसर्जन मिरवणुकीत तहानभूक विसरुन सामील झाले होते.
शिवछाया मित्र मंडळाच्या नवी मुंबईच्या राजाला "गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" अशी साद घालत भावपूर्ण वातावरणात तुर्भे गावातील तलावात विसर्जन करण्यात आले.
शिवछाया मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या शिस्तबद्ध मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी अशोक पाटील,संजय गुरव, नंदकुमार पाटील,रामकृष्ण पाटील,सुशील घरत,विजय पाटील यांनी मिरवणुकीत सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
मिरवणुकीला आणि या दहा दिवसीय गणेशोत्सवाला विशेष सहकार्य केल्याबद्दल नवी मुंबई महानगर पालिका, एमएसईडी, पोलीस यंत्रणा, देणगीदार,व्यापारी,हितचिंतक आणि गणेशभक्त यांना शेवटी मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी धन्यवाद दिले.