घणसोली डेपोत आग; ४ एनएमएमटी बस जळून खाक
वाशी : घणसोली येथील नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) बस आगारात उभ्या असलेल्या बसेसना अचानक भीषण आग लागल्याची घटना ४ जून रोजी घडली. या आगीत ४ एनएमएमटी बस जळून खाक झाल्या असून, इतर ७ बसना आगीची झळ बसली आहे.
४ जून रोजी सकाळी साडेसात वाजता घणसोली डेपोत उभ्या असलेल्या एनएमएमटी बसनी अचानक पेट घेतल्याने आगीची भीषण घटना घडली.आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दल जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, एनएमएमटी बस डेपोत बसेस दाटीवाटीने उभ्या असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बसना आग लागताच डेपोतील बस चालकांनी इतर बसेस बाजूला काढल्याने मोठी वित्तहानी टळली.
एनएमएमटी बस डेपोत लागलेल्या आगीत एक इलेक्ट्रिक आणि तीन डिझेल बस मिळून एकूण ४ एनएमएमटी बस जळून खाक झाल्या तर इतर ७ बसना आगीची झळ बसल्याने त्या किरकोळ जळाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले असून, उशिरा पर्यंत आगीचे कारण स्पष्ट झाले नाही, अशी माहिती नवी मुंबई महापालिका अग्निशमन केंद्र प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.