युध्दपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम सुरु
भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.
महापालिकेच्या प्रसिध्दी पत्रकात आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नमूद केले आहे की, शहरातील रस्ते देखभाल-दुरुस्तीचे अधिकार विविध संस्था आणि विभागांकडे विभागले गेले आहेत. ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'कडे फाऊंटन हॉटेल ते दहिसर चेक नाका दरम्यानचा रस्ता, तर ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'कडे दहिसर चेक नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पुढे गोल्डन नेस्ट ते सुभाषचंद्र बोस मैदान दरम्यानच्या रस्त्यांची जबाबदारी आहे. तर महापालिकेकडे गायमुख ते फाऊंटन आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहरात सुरु असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे काही ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरु असून, त्यामध्ये १२३ कि.मी. व्यासाच्या वाढीव पाणी पुरवठा जलवाहिनी प्रकल्पाचा समावेश आहे. तसेच ३ कि.मी. लांबीची मलवाहिनी कामामुळे देखील काही भागात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, खड्डे बुजवण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. ‘एमएमआरडीए'मार्फत शहरात ३७ सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे तर महापालिकेच्या मार्फत १५ सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे देखील प्रगतीपथावर आहेत. याच अनुषंगाने महापालिकेने मागील ४ दिवसांत ६२७ खड्डे खडीकरण,डांबरीकरणाद्वारे बुजविण्यात आलेले आहेत.
‘एमएमआरडीए'ने दहिसर चेक नाका ते सुभाषचंद्र बोस परिसरात ७६ खड्डे खडीकरण, डांबरीकरणाद्वारे बुजविण्यात आलेले असून, ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'मार्फत आतापर्यंत १५० खड्डे खडीकरण, डांबरीकरणाद्वारे बुजविण्यात आलेले आहेत. महापालिका क्षेत्रात खड्डे बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त - मिरा भाईंदर महापालिका.