विराग मधुमालती यांची नव्या विक्रमाला गवसणी
नवी मुंबई : आपल्या विविध विक्रमांद्वारे वर्ल्ड रेकॉर्डस बुक ऑफ इंडिया मध्ये नाव कोरणारे नवी मुंबईतील प्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांनी आणखी एका वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. त्यांनी शिवभक्तीचे शिखर स्तोत्र मानल्या जाणाऱ्या शिवतांडव स्तोत्रम्चे संपूर्ण गायन केवळ १ मिनिट ३३ सेकंदात पूर्ण करून हा अद्वितीय जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या आधीही त्यांनी ७ वेळा जागतिक विक्रम प्रस्थापित करून भारताचा गौरव वाढवला आहे.
विशेष म्हणजे शिवतांडव स्तोत्रम सादरीकरणाचे चित्रीकरण लोणावळा इथल्या कॅनरी आयलंडवर करून ते त्यांच्या यूट्यूब चॅनल विराग मधुमालती म्युझिकवर प्रकाशित केल्याची माहिती विराग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गत चार वर्षापासून शिवतांडव स्तोत्रम् वर विशेष संशोधन व अभ्यास करून हा विक्रम प्रस्थापित केला असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत त्यांची सहचारिणी वंदना वानखेडे, तसेच कॅनरी आयलंडचे संस्थापक नंदकुमार वाळंज व संचालक सागर वाळंज उपस्थित होते.
याशिवाय अनेक सामाजिक विषयांवर जनजागृतीपर अभियान राबविल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये नेत्रदान जनजागृतीसाठी सलग १०० दिवस डोळ्यांवर काळी पट्टी बांधून दिव्यांग व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्याचा अनुभव घेत जागोजागी कार्यक्रम घेऊन नेत्रदानाचे महत्व लोकांना पटवून दिल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, विराग मधुमालती यांनी सफ्टेंबर २०२४ मध्ये नवी मुंबई ते राजस्थानातील नाकोडाजी देवस्थानापर्यंत १३०५ किमी अंतराची पदयात्रा साधारण१०० दिवसांत त्यांनी पूर्ण केली आहे. या पदयात्रे दरम्यान ठिकठिकाणी एकूण ५४ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येऊन गावोगावी पर्यावरण जनजागृतीचे कार्य त्यांनी केले. या पदयात्रेत सलग २४ तासांत १११ किमी चालत आणखी एक जागतिक विक्रम त्यांनी नोंदवला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीने नवी मुंबईला तसेच भारतीय संस्कृती आणि भक्तीपरंपरेला जागतिक स्तरावर गौरव मिळवून दिला आहे.