रस्ता खचला प्रकरण

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू असताना १७ मे २०२५ रोजी जमीन खचण्याची मोठी दुर्घटना घडली. दुसऱ्याच दिवशी १८ मे रोजी सकाळी त्याला लागूनच असलेला सिमेंट रस्ता खचला गेला होता. या घटनेला २ महिने होत येऊनही संबंधित दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता किंवा कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासन दोषींना पाठीशी घालत असल्याची शहरात चर्चा सुरु असताना आता रस्ता खचल्याप्रकरणी विकासकाला जबाबदार धरत महापालिका प्रशासनाने ४६ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, बांधकाम व्यावसायिकाला एका महिन्याच्या आत आयआयटी किंवा व्हीआयटीटीआय कडून कामाचा आराखडा आणि तपशील तयार करुन ‘एमएमआरडीए'कडून मंजुरी घ्यावी लागेल. त्यानुसार रस्त्याचे बांधकाम ‘एमएमआरडीए'च्या देखरेखीखाली पूर्ण करावे लागेल. प्रथम बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीचे पायलिंगचे काम पूर्ण करुन झाल्यावर बांधकाम विभागाकडून रस्ते, गटारे आणि पाण्याच्या नळ जोडणीचे काम केले जाईल. सर्व काम पूर्ण करण्यासाठी ५ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परंतु, भविष्यात रस्ता खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी या आदेशात निश्चित केलेली नाही.

महापालिकेने केलेल्या मुल्यांकनात ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यातील १० टक्के म्हणजेच ४६.५० लाख रुपयांचा दंड बिल्डरला ठोठावण्यात आला आहे. ‘एमएमआरडीए'च्या अहवालात बांधकाम व्यावसायिकाने रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचे उघड झाले आहे. अहवालानुसार, सिमेंट काँक्रीटच्या फरशीऐवजी रॅबिट टाकण्यात आले होते. ‘एमएमआरडीए'ने महापालिकेला पत्र लिहून इशारा दिला होता. यामुळे रस्ता खचल्याप्रकरणी विकासकाला जबाबदार धरत महापालिका प्रशासनाने ४६ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर रक्कम महापालिकेच्या नगररचना विभागात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव ‘युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत