ना. गणेश नाईक यांचा सलग 11 तास जनता दरबार; 450 पेक्षा अधिक निवेदने प्राप्त
नवी मुंबई : नामदार गणेश नाईक यांचा जनता दरबार 26 जून 2025 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. या जनता दरबारामध्ये विविध विषयांवरील 450 पेक्षा अधिक निवेदने प्राप्त झाली. 60% निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. उर्वरित समस्यांचा निपटारा समयबद्ध रीतीने करून त्याची पोहोच निवेदनकर्त्यांना देण्यात येणार आहे.
जनता दरबार सलग 11 तास चालला. सकाळी 10 वाजता सुरू झालेला नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा सिलसिला रात्री 10 वाजेपर्यंत अविरत सुरू होता. पाणीपुरवठा, शिक्षकांचे प्रश्न, बीएमटीसी कामगारांसाठी नुकसान भरपाई, प्रशासकीय यंत्रणेकडून अन्याय अशा विविध विषयांवर नागरिकांनी निवेदने सादर केली. जनता दरबारास माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस, वने, वाहतूक नियंत्रण, आरटीओ, शिक्षण अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तात्पुरत्या शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीची मागणी माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी निवेदनाद्वारे केली. प्रभाग क्रमांक 44 सेक्टर 7, 14 आणि 15 ते 18 या भागात सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठा बाबत माजी नगरसेविका भारती पाटील यांनी निवेदन दिले. तर सानपाडा पामबीच सेक्टर 17 मध्ये या भागातील जनभावना पाहता या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देऊ नये, यासाठी निशांत भगत यांनी निवेदन दिले. प्राप्त निवेदनांवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश नामदार नाईक यांनी दिले. जनतेची कामे करणाऱ्या कार्यतत्पर अधिकाऱ्यांचे कौतुक करताना स्वार्थी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना यावेळी नाईक यांनी कानपिचक्या दिल्या.
सिडकोच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये घरे विकण्यासाठी कधीच एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. मात्र, यंदा ती करण्यात आली आहे. या निर्णयामागचा हेतू तपासण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली. लोककल्याणासाठी वर्तनात सुधारणा करण्याचा सल्ला चुकणाऱ्या अधिकाऱ्यांना नाईक यांनी यावेळी दिला.
राज्य सरकारच्या मूलभूत सुविधा निधीतून नवी मुंबई महापालिकेने "टो-गो" वाहन खरेदी केले आहे. या वाहनाचे लोकार्पण गणेश नाईक यांच्या हस्ते जनता दरबार प्रसंगी करण्यात आले. "टो-गो" प्रणाली ही पर्यावरणपूरक असून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खतात रूपांतर करते. सदर प्रक्रिया एकाच ठिकाणी करण्यात येत असल्याने जागेची देखील बचत होते.