‘नमुंमपा'ची अत्याधुनिक सेवा प्रणालीकडे वाटचाल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष आहे. त्या अनुषंगाने सर्व सेवा डिजीटल करुन नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे न लागता महापालिकेशी संबंधित विविध प्रमाणपत्रे, परवाने, ना-हरकत प्रमाणपत्रे त्यांना घरीच उपलब्ध व्हावीत यादृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल सेवा प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गतीमानतेने अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा राबवितानाही सेवा-सुविधांची लोकाभिमुख सुलभता आणि गतीमानता यावर भर दिला जात असून महारपालिकेच्या विविध कार्यालयांना भेटी देत आयुक्त डॉ. शिंदे विद्यमान कार्यप्रणालीत अधिक गतीमान सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत आहेत.

या अनुषंगाने कोपरखैरणे विभाग कार्यालयाला भेट देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कार्यालयीन स्वच्छता आणि अभिलेखाचे निंदणीकरण, मांडणी अशा सर्वच बाबींची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये नागरी सुविधा केंद्राच्या बाहेरील बैठक व्यवस्थेमध्ये वाढ करण्याच्या सूचना केल्या. जन्म-मृत्यू नोंदीविषयक कार्यालयीन दप्तराची पाहणी करताना आयुक्तांनी सदर प्रणाली नागरिकांना अधिक सोयीची होण्याच्या दृष्टीने विद्यमान डिजीटल प्रणालीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले. जेणेकरुन नागरिकांना घरबसल्या नोंदणी करता येईल आणि घरीच प्रमाणपत्र प्राप्त होईल.

त्याचप्रकारे विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करुन ज्याप्रमाणे पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे डिजीटली अपलोड करण्यात येतात आणि संबंधितांना कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचा दिनांक संदेशाद्वारे पाठविला जातो, तशीच प्रणाली राबविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिले. सदर अर्ज नागरिक स्वतः करु शकतात. तसेच सेतू कार्यालयातूनही करु शकतात अशाप्रकारे जलद सुविधा करावी, असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

डेब्रिज परवानगी तसेच मैदाने वापर परवानगी यामध्येही सुधारणा करुन सर्व यंत्रणा डिजीटली कराव्यात. तसेच या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादीचा फलक तळमजल्याप्रमाणेच पहिल्या मजल्यावरही दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी. त्याचप्रमाणे सर्व प्रमाणपत्र वितरण विषयक बाबींची रजिस्टरमध्ये रितसर नोंद करुन ठेवावी आणि विभाग अधिका-यांनी ते तपासून नियंत्रण ठेवावे, असे निर्देश सहा. आयुक्त वसंत मुंडावरे यांना दिले.

दरम्यान, सदर पाहणी दौ-यात आयुक्त डॉ. शिंदे यांनी कोपरखैरणे माता-बाल रुग्णालयाच्या कामाचीही पाहणी करुन रस्त्यावरील दोन्ही प्रवेशद्वारांचे विस्तारीकरण करण्याचे आणि त्यामधील अडथळे दूर करण्याचे सूचित केले. तसेच काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, उपायुक्त डॉ.अजय गडदे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये यांना दिले.

१०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत मुख्यालयासह महापालिकेची विभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा आणि इतर कार्यालयांमध्ये ७ कलमांनुसार जलद गतीने कार्यवाही सुरु असून महापालिका कार्यालयांचे रुप बदलल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच सेवापूर्ततेतही प्रभावी डिजीटलायझेशनमुळे सेवा पुर्ततेत सुलभता आणि गतीमानता आलेली आहे, याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मालमत्ताकर हस्तांतरण प्रणाली तसेच मालमत्ता मूल्यांकन प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी तसेच त्यामध्ये संपूर्ण डिजीटलायझेशन करण्याच्या दृष्टीने तत्परतेने सुधारणा करण्यात यावी. विभाग कार्यालय हद्दीतील संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था अशा सर्व खाजगी बाबींच्याही नोंदी महापालिकेकडे ठेवाव्यात. मैदाने वापर परवानगीची सुलभ नियमावली तयार करण्यात यावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘व्हर्टिकल गार्डन'ची संकल्पना रद्द