रिक्षा चोरुन जालना येथे विक्री; दुक्कल जेरबंद
नवी मुंबई : नवी मुंबईतून रिक्षा चोरुन सदर रिक्षा जालना जिल्ह्यामध्ये विक्री करणाऱ्या २ सराईत चोरट्यांना सीबीडी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन अटक केली आहे. या चोरट्यांनी नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील १२ रिक्षा चोरल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी सदर सर्व १२ रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
२८ मे रोजी सीबीडी, सेक्टर-११ भागातून रिक्षा चोरीला गेली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीडी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या गुन्ह्यातील रिक्षा चोरांचा शोध सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघ आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच आजुबाजुच्या परिसरातील सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २ संशयित आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन मुख्य आरोपी नाजिमोद्दीन अजीमुद्दीन काझी (४३) याला जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी नाजिमोद्दीन काझी याची सखोल चौकशी केली असता, तो आणि त्याचा साथिदार साकीब शमसु शेख (२४) या दोघांनी जालना येथून नवी मुंबईत येऊन सीबीडी, खारघर, कळंबोली आणि पनवेल या परिसरातून एकूण १२ ऑटो रिक्षा चोरुन नेल्याची माहिती दिली. तसेच सदर रिक्षांवरील नंबर तसेच चेसिस नंबर बदलून त्यांची विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी साकीब शमसु शेख याला अटक करुन अधिक तपास करुन या चोरट्यांनी नवी मुंबईतून चोरी केलेल्या १२ ऑटो रिक्षा जालन्यातील परतूर, मंठा, तसेच हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत केल्या.
सदर गुन्ह्यातील ऑटो रिक्षाचे आरटीओ नोंदणी क्रमांक, इंजिन नंबर, चेसिस नंबर मिटवले असताना त्यांची ओळख पटविणे अत्यंत जिकीरीचे होते. मात्र, त्यानंतर देखील सीबीडी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करुन सदर ऑटो रिक्षांची ओळख पटवून एकूण १२ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी दिली. सदर आरोपींनी सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३, खारघर आणि कळंबोली येथील प्रत्येकी ४ तर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील १ असे एकूण १२ रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.