वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका; गरोदर महिलेचे हाल
उरण : नवी मुंबई परिसरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना चिर्ले-दिघोडे, गव्हाण फाटा-पाडेघर तसेच खोपटा पुल ते धुतूम या मार्गावरील दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यास वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. दररोज हजारो वाहन चालकांना या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना ३० ऑगस्ट रोजी रात्री गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.
वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताह यशस्वीरित्या राबविल्यामुळे एकीकडे कौतुक सोहळा नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून केला जात आहे. मात्र, वाहतूक शाखेला चिर्ले-दिघोडे, गव्हाण फाटा-पाडेघर तसेच खोपटा पुल ते धुतूम या मार्गांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी दिसत नाही. सदर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक सुरु असून त्याचा नाहक त्रास रहदारीच्या रस्त्यावरील प्रवाशी वाहनांसह रुग्णवाहिकेला देखील सहन करावा लागत आहे.
त्यात वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका वेळेवर रुग्णालयात पोहोचू न शकल्याने अनेकदा रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही आणि दुर्दैवी घटना घडतात. यावर मात करण्यासाठी, रुग्णवाहिकांना वेळेवर जाण्यासाठी मार्ग मोकळा करणे आणि वाहतूक नियमांमधील सवलतींचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन प्रणालीचा वापर करणे देखील महत्त्वाचे आहे. मात्र, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तसे होताना दिसून येत नाही.
त्यातच ३० ऑगस्ट रोजी रात्री गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका दिघोडे-चिर्ले रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकून पडल्याची दुदैवी घटना घडली. त्यामुळे ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पोलीस यंत्रणा विशेष करुन लोकप्रतिनिधी यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.