डोंगराच्या कुशीत असलेल्या तलावास संजीवनी

खारघर : ओवे डोंगराच्या पायथ्याशी खिजत पडलेल्या धरणाकडे पनवेल महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. ५ कोटी रुपये खर्च करुन तलावाच्या विकास केला जाणार असून धरणातील राखीव पाण्याचा उपयोग खारघरवासियांसाठी केला जाणार आहे.

पनवेल तालुक्यात तळोजा गांव पूर्व कालीन बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. १९६० ते ६५ या काळात गावातील विहिरीने तळ गाठले. ग्रामस्थांनी काही ठिकाणी बोअरवेलच्या माध्यमातून प्रयत्न केले. मात्र, पाणी खारट येत असल्यामुळे पदरी निराशा आली. यावेळी मिळेल त्या पाण्यावर गरज भागविली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी पाण्यासाठी महिलांची होणारी पायपिट पाहून ग्रामस्थांनी पनवेल वन विभागाकडे डोंगरात धरणाची मागणी केली आणि वन विभागाकडून  धरणास मंजूरी मिळाली. तसेच तळोजा ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे गावातील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पांडवकडा पासून काही अंतरावर ओवे डोंगराच्या कुशीत गावासाठी स्वतंत्र तलाव उभारुन गावात पाणी पुरवठा सुरु केला. कालांतराने तळोजा एमआयडीसी आणि सिडको यांच्याकडून पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांचे या धरणाकड दुर्लक्ष झाले.  

दरम्यान, तलावात डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे गाळ साचल्याने जलसाठा कमी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खिजत पडलेल्या धरणाकडे महापालिकेने लक्ष केंद्रित करुन या धरणाचा विकास करण्याच्या कामाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, धरणात साचलेला गाळ काढून त्यात जमा होणारा पाण्याचा उपयोग खारघर विभागासाठी केला जाणार आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर धरणातील पाणीसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे. ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल, त्यावेळी या धरणातील पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. या धरणातून पावसाळ्यात ५ एमएलडी तर इतर वेळी दीड ते दोन एमएलडी पाणी खारघरवासियांना उपलब्ध होणार आहे. धरणाच्या विकास कामासाठी ५ कोटीची मंजुरी दिली असून लवकरच निविदा काढली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तळोजा गावातील जुने जाणत्या ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार या धरणाची खोली २२ मीटर इतकी आहे. तलावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गळती लागली. आता महापालिकेने धरणात साचलेला गाळ उपसा करुन तलावाची गळती  रोखल्यास खारघरवासियांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होवू शकतो.

सर धरणात पावसाळ्यात अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी या धरणाची पाहणी केली होती. त्यावेळी महापालिकेने सदर धरणाचा विकास करावा, अशी मागणी केली होती. मात्र, विद्यमान महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सदर धरणाच्या विकास कामासाठी मंजुरी देवून विकास करणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे समाधानाची बाब आहे.
- मन्सूर पटेल, पदाधिकारी-भाजपा, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बिबट्याचा वावर; मोहोने एनआरसी परिसरात घबराट