शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरु
उरण : उरण मधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी ११ ऑगस्ट पासून शेवा येथील आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय गेटसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली. तसेच, १९८४ मधील शेतकरी आंदोलनातील पाच हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करुन, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून माजी जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला.
जुलै २०१७ पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, जुन्या भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ पुन्हा सुरु करावा, गेली १० ते १२ वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करुन शासकीय नियमानुसार वेतन आणि नेमणूक पत्र द्यावे, सन २००३-०४ पासून मराठी माध्यमातून अनुदान न घेता दहावीच्या वर्गांना शासनाकडून १०० टक्के अनुदान स्वीकारावे, जेएनपीटी प्रशासनाकडून दिली जाणारी पीएपी फी सवलतीची ३ लाख रुपयांची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढवावी, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना १२ वर्षांची वरिष्ठ श्रेणी आणि २४ वर्षांची निवड श्रेणीचा लाभ तात्काळ मंजूर करावा, सातव्या वेतन आयोगातून ३१ महिन्यांची थकबाकी आणि सहाव्या वेतन आयोगाची ५१ महिन्यांची थकबाकी तात्काळ जमा करावी, पन्नास टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करुन बावीस महिन्यांची थकबाकी तात्काळ जमा करावी आणि पाचव्या वेतन आयोगातील ६३ महिन्यांची थकबाकी जमा करावी, आदी प्रमुख मागण्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनासमोर मांडल्या आहेत.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.
यावेळी जेएनपीटी विश्वस्त रवी पाटील, कामगार नेते संतोष पवार, ‘पालक संघर्ष समिती'चे अध्यक्ष किरण घरत, उपाध्यक्ष योगेश तांडेल, सचिव अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, सहसचिव विश्वास पाटील, कामगार नेते रवींद्र घरत (जासई), किरण वि्ील घरत, ‘टीडीएफ'चे कार्याध्यक्ष नरसू पाटील, पीटीए सदस्य विकास कडू, उरण काँग्रेस महिला अध्यक्ष रेखा घरत, प्राध्यापक एल. बी. पाटील, ‘करळ सावरखार ग्रामपंचायत'च्या सरपंच अनिता अरविंद घरत, उपसरपंच जितेंद्र घरत, ‘जसखार ग्रामपंचायत'च्या उपसरपंच हेमलता भालचंद्र ठाकूर, ‘जसखार ग्रामपंचायत'चे माजी सरपंच नितीन पाटील, उरण पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, माजी सरपंच निशांत विष्णू घरत (नवीन शेवा), योगेश भगत (भेंडखळ), प्राध्यापक राजेंद्र मढवी, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था'चे कार्याध्यक्ष वि्ील ममताबादे (उरण), कामगार नेते सुरेश पाटील, उरण तालुका भाजपा चिटणीस बळीराम घरत (जासई), सामाजिक कार्यकर्ते शिरीष म्हात्रे (जासई), ‘पालक संघर्ष समिती'चे उपाध्यक्ष अमर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे (बेलपाडा), ‘नवघर ग्रामपंचायत'च्या सरपंच सविता नितीन मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व पालक, पालक संघर्ष समिती, माजी विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींनीही उपस्थिती दर्शवून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला शेवटपर्यंत पाठिंबा देणार असल्याची ग्वाही दिली.