जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप संस्थेतर्फे वृक्षारोपण मोहीम संपन्न
नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप यांच्या संयुक्त विद्यमाने करावे गाव येथील स्वर्गीय गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. तसेच पर्यावरण पूरक ज्युट बॅगांचे वितरण करण्यात आले.
यंदा वृक्षारोपण उपक्रमाला २० वर्षे पूर्ण झाली असून, विकास होत असताना पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधतेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संदीप नाईक यांनी यावेळी केले.
वृक्षारोपण मोहिमेमध्ये नवी मुंबईतील वृक्षप्रेमी, करावे ग्रामस्थ, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था,ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जंगलतोड, मोकळ्या जागांचा ऱ्हास, नागरी क्षेत्रातील काँक्रीटीकरण, तसेच वायु, जल, ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या पातळी यांसारख्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता व्यक्त करून संदीप नाईक यांनी लोकसहभाग आणि प्रशासकीय व्यवस्थांकडून जाणीवपूर्वक पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
"वृक्षारोपण ही केवळ पर्यावरण पूर्ती नसून, बिघडत चाललेल्या जैवविविधता आणि परिसंस्थेतील असमतोलाच्या पार्श्वभूमीवर ही एक नागरिक जबाबदारी आहे," असे मत संदीप नाईक यांनी या प्रसंगी व्यक्त केले. त्यांनी नागरी जंगल, घटणारी मोकळी हरित स्थळे आणि वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत उपाययोजनांची, प्लास्टिक वापर विरहित आणि पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. डीपीएस तलावाचे रक्षण हे लोक-सहभाग आंदोलनाच्या माध्यमातून घडवलेले एक यशस्वी उदाहरण म्हणून त्यांनी अधोरेखित केले. फ्लेमिंगो ही नवी मुंबईची ओळख आहे आणि त्यांचा अधिवास असलेला डीपीएस तलाव विकास बांधकामासाठी देण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु, वनेमंत्री गणेश नाईक यांनी या क्षेत्राला संरक्षित वनाचा दर्जा देऊन तलाव वाचवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, याबद्दल नवी मुंबई पर्यावरण प्रेमींच्या वतीने संदीप नाईक यांनी धन्यवाद दिले.
या वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत नागरी परिसंस्था निर्मितीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा ठेवा संवर्धन करून ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पर्यावरणाचा समतोल राखून विकास कामे झाली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन केवळ जागतिक पर्यावरण दिनी नव्हे तर वर्षाचे 365 दिवस करण्याचे काम असून प्रत्येक घटकाने आपले योगदान यामध्ये दिले पाहिजे.
मागेल त्याला झाड उपक्रम...
संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप या संस्थांमार्फत मागेल त्याला झाड हा उपक्रम राबवून वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जाते. वर्षभर पर्यावरण रक्षणाचे आणि जनजागृतीचे उपक्रम राबविले जातात. गाव गावठाण, डोंगर, सोसायट्या, रस्त्याच्या कडेला मैदाने, मोकळ्या जागा अशा विविध ठिकाणी त्या त्या भागात जगणारी झाडे लावली जातात. याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले जाते.