माणुसकी ओशाळली!
वाशी रुग्णालयातील प्रकार; व्हायरल व्हिडीओ नंतर मनसैनिक आक्रमक
नवी मुंबई : मेलेल्या माणसाच्या टाळवरील लोणी खाणे म्हणजे काय? या म्हणीची प्रचिती देणारा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मृतदेहाला व्यवस्थित कपडा गुंडाळून देतो, २ हजार रुपये द्या.. अशी मागणी करुन शवागऱ्यातील कर्मचाऱ्याने मृतांच्या नातेवाईकांना लुबाडल्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या वाशी मधील सार्वजनिक रुग्णालयात घडला आहे.
दरम्यान, डेडबॉडी व्यवस्थित गुंडाळण्यासाठी शवागरातील कर्मचाऱ्याने मृताच्या नातेवाईकांकडून २ हजार रुपये उकळल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होताच मनसैनिक आक्रमक झाले. या संतप्त मनसैनिकांनी १७ जून रोजी वाशीतील महापालिका रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षकांना मृतदेह गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारे कापडे घालून त्यांचा सत्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी ऐरोली मध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सदर तरुणीचा मृतदेह नवी मुंबई महापालिकेच्या वाशी मधील सार्वजनिक रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचे नातेवाईक रुग्णालयात आले असता रुग्णालयाच्या शवागरातील कर्मचाऱ्याने तरुणीचा मृतदेहाला कपडा व्यवस्थितत गुंडाळून देतो, २ हजार रुपये द्या, अशी मागणी मयत तरुणीच्या नातेवाईकांकडे केली. यानंतर या कर्मचाऱ्याने नातेवाईकांकडून २ हजार रुपये घेतले. अखेर सदर सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने नवी मुंबईत चांगलीच खळबळ उडाली आहे.
त्यामुळे या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेची गंभीर दखल घेत संतप्त झालेल्या मनसैनिकांनी १७ जून रोजी वाशीतील महापालिका रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षकांनाच घडल्या प्रकाराचा जाब विचारला. यावेळी मनसैनिकांनी शवागृहातील संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासह संबंधित कंत्राटदाराविरुध्द देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतदेह गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारे कापडाने वैद्यकीय अधीक्षकांचा सत्कारही केला.
दरम्यान, रुग्णालयामध्ये मृताच्या नातेवाईकांची लुबाडणूक केल्याचा प्रकार घडला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही तक्रार मयत तरुणीच्या नातेवाईकांनी केलेली नसल्याची माहिती मिळत आहे. तरीही याबाबत रुग्णालय प्रशासनाने संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.