बिबट्याचा वावर; मोहोने एनआरसी परिसरात घबराट
कल्याण : मोहोने गावातील एनआरसी परिसरात बिबट्यासारखा वन्यप्राणी फिरताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना अदानी कंपनीच्या सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आली असून, रात्री गस्त घालताना जंगलाच्या सीमेलगत बिबट्या सदृश्य प्राण्याला पाहिल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एनआरसी परिसर वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक वावराचा भाग असल्याने यापूर्वीही येथे प्राणीदर्शनाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी बिबट्यासारखा प्राणी थेट वस्तीच्या आसपास दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
यासंदर्भात कल्याण वन विभागाचे अधिकारी निलेश आखाडे यांनी सांगितले की, सदर घटनेची माहिती मिळताच संबंधित बीट कर्मचारी सानप, भाऊसाहेब आणि इतरांसह घटनास्थळी पाठवण्यात आले असून स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मानवी वस्तीत चुकून शिरलेला बिबट्या अथवा चित्त्यासदृश्य प्राणी सहसा फार वेळ थांबत नाही, तो काही किलोमीटर लांब जातो. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, पण दक्षता आवश्यक असल्याचे आखाडे यांनी स्पष्ट केले.
वन विभाग आणि प्रशासनाने घटनास्थळी पाहणी सुरु केली असून, परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. लवकरच प्राण्याची ओळख निश्चित करुन आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असा विश्वासही स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
१८ जुलै रोजी मध्यरात्री एनआरसी कंपाऊंंड अदानी वेअरहाऊस जवळील रस्त्याकडून मौजे आंबिवली सर्व्हे नं. ११, २५, २७ मधील वनक्षेत्रकडे जाताना बिबट्या स्थानिक नागरिकांना दिसून आला होता. तसेच १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास मौजे मानिवली गावाकडील भागात बिबट्या दिसून आल्याची बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने या दोन्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्याचे आखाडे यांनी सांगितले.