अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडीत

ठाणे : दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत १० मोटर पंप जप्त करण्यात आले, तर ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या. सदर सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.

अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीने खंडीत करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.

त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समिती क्षेत्रात २५ आणि २६ जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडीत करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करुन तेथील नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शिळ-महापे रोड परिसर, दातिवली रोड, शांती नगर, मुनीर कम्पाऊंड या भागांमध्ये सदर कारवाई करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी