आ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांचे फलित
नवी मुंबई : नवी मुंबई मधील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय बुध्दीमत्ता असूनही तरुण-तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित रहावे लागत होते. याचा गांभिर्याने विचार ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मंजूर झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त झाला आहे. याबद्दल आ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर ‘भारतीय जनता पार्टी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
नवी मुंबईतील विकास कामांबरोबरच येथील तरुणांना आणि खेळाडुंना आधुनिक क्रीडा आणि मनोरंजनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अनेक वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. बेलापूर गांव येथील कुस्तीच्या मैदानावर आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, सीबीडी सेक्टर-३ राजीव गांधी मैदानालगत सुविधायुक्त इनडोअर स्पोर्टस् इमारत बांधणे, नेरुळ सेक्टर-९ मधील भू.क्र.१२१-बी वर आचार्य तुळशी मैदानात आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे, वाशी सेक्टर-१०ए मधील भू.क्र. ११ आणि १२ येथे विविध खेळांच्या आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे या सर्व सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईतील तरुणांना आणि खेळाडुंना एक क्रीडा व्यासपीठ निर्माण होणार आहे, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच सामाजिक न्याय, महिलांच्या सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या थोर विभूतींचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वरुपात त्यांच्या पुतळ्यांची उभारणीकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी आमदार म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई'मध्ये उभारण्यात येणाऱ्या तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्यात असून त्याचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.
दरम्यान, ‘भाजपा'च्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या समस्यांवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सदर समस्या सोडविण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्यासह आ. मंदाताई म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार, राजू शिंदे, समाजसेवक दत्ता घंगाळे, पांडुरंग आमले, राजू तिकोने, आबा जगताप, प्रवीण भगत, राखी पाटील तसेच बेलापूर मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, आदि उपस्थित होते.