१२ फर्निचर गोदामे जळून खाक
भिवंडी : भिवंडीमध्ये आगीच्या घटनांचे सत्र सुरु असतानाच तालुक्यातील राहनाळ गावच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात फर्निचर साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना २६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण इमारतीतील १२ गोदामे जळून खाक झाली असून सुदैवाने फक्त वित्तहानी झाली असून जीवितहानी टळली आहे.
दरम्यान, सदरची भीषण आग आटोक्यात आणत असताना भिवंडी अग्निशमन दलाचा एक कर्मचारी गंभीर झाला आहे.
भिवंडीतील राहनाळ गावच्या हद्दीतील स्वागत कंपाऊंड मधील फर्निचरच्या गोदामाला २६ एप्रिल रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली. सदर आग इतकी भीषण होती की, पाहता पाहता इमारतीतील आजुबाजुची १२ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडून फर्निचरची संपूर्ण इमारत जळून खाक झाली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची २ तसेच कल्याण आणि ठाणे अग्निशमन दलाची प्रत्येकी १ अशी ४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलातर्फे देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न पहाटे पासूनच सुरु होते.
यावेळी धगधगत्या आगीत धुराचे लोट आकाशात पसरले होते. घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न दुपारच्या सुमारास सुरु असतानाच भिवंडी अग्निशमन दलातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरिश्चंद्र वाघ (५४) असे अग्निशमन कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. सदर आगीच्या तीव्रतेने फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने ३ मजली इमारतीच्या गोदामाच्या भिंतीही कोसळण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण इमारत अग्निमय होत कोसळली. परंतु, सुदैवाने या भीषण आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फर्निचर जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले असून या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ९ ते १० तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.