भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांना मनसेचा घेराव
भाईंदरः मराठी भाषा येत नसलेल्या रिक्षा चालकांचे परवाने रद्द करण्याच्या निर्णयावरून वाद पेटला असतानाच मराठी सक्तीला विरोध करणारे ॲड. गुणवंत सदावर्ते मिरा-भाईंदरमध्ये आले असताना मनसेने आक्रमक पवित्रा घेत त्यांना घेराव घालून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची घरपकड केली. दरम्यान शहरातील रिक्षांवर ‘मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा' असे स्टिकर मनसेने लावले आहेत. तर मराठी एकीकरण समितीने आव्हानात्मक पवित्रा घेत, ‘तुम्ही संप कराच, मराठी भाषिक लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरतील '; असा सज्जड इशारा दिला आहे.
मराठी भाषा यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेत चर्चेत राहिलेल्या मिरा रोडमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यावरून वाद उफाळून आला आहे. १ मे पासून मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने रद्द करण्याच्या निर्णयावरून परप्रांतीय रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत.
त्यांनी ४ मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना पाठिंबा देणारे सदावर्ते हे मिरा रोड येथील भाजप जिल्हा कार्यालयात आमदार नरेंद्र मेहता यांना भेटण्यासाठी आले असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळतात, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना विरोध केला. भाजपा कार्यालयातून बाहेर पडताच मनसेचे सचिन पोपळे आणि संजय सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना मज्जाव केला.
दरम्यान सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची वैचारिक दिवाळखोरी झाली असल्याचे वक्तव्य केल्यामुळे मनसे कार्यकर्ते अधिकच भडकले आणि मराठी भाषेचा अवमान सहन करणार नाही, अशा घोषणा दिल्या. सदावर्ते यांच्या समर्थकांनीसुद्धा घोषणा दिल्या. वातावरण तापल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करत पोलिसांच्या गाडीत बसवले. तत्पूर्वी सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी अनेक शेकडो रिक्षा चालकांची भेट घेऊन त्यांच्या रिक्षावर ‘मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा' अशा आशयाचे स्टिकर लावले. आणि मराठी सक्तीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान ‘मराठी एकीकरण समितीे'चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनीसुद्धा मराठी सक्तीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत त्याला विरोध करून संपाची धमकी देणाऱ्या रिक्षा चालकांवर आव्हानात्मक भूमिका घेत ‘तुम्ही संप कराच, मराठी भाषिक लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरतील ' असा सज्जड इशारा दिला आहे. या सर्व घडामोडीमुळे १ मे नंतर मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण अधिकच तापण्याचे संकेत मिळत आहेत.