रस्ता खचला; दोषी अजुनही मोकाट
भाईंदर : इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरु असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात जमीन खचून तसेच दुसऱ्या दिवशी त्याला लागूनच असलेला सिमेंट रस्ता खचण्याची मोठी दुर्घटना घडून महिना झाला, तरी सुध्दा या संबंधित दोषी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून पोलीस आणि महापालिका प्रशासन दोषींना पाठिशी घालत असल्याची शहरात चर्चा सुरु आहे.
भाईंदर पूर्व मधील इंद्रलोक परिसरात बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरु असताना १७ मे रोजी जमीन खचण्याची मोठी दुर्घटना घडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १८ मे रोजी सकाळी त्याला लागूनच असलेला सिमेंट रस्ता खचला गेला. घटनास्थळाच्या दोन्ही बाजुला शाळा आहेत; परंतु शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्या बंद होत्या. त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली आहे. शहरात अनेक ठिकाणी उत्तुंग इमारतींचे काम सुरु आहे. अनेक बिल्डर कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे इमारतीवरुन पडून किंवा काम करताना कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडून निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याकडे महापालिका आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहेत.
१७ मे रोजी सकाळी इंद्रलोक परिसरात असाच प्रकार घडला आहे. सदर काम रस्त्याच्या बाजुलाच सुरू असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेची पुर्णपणे काळजी घेणे आणि त्यांच्या माहितीसाठी सूचना फलक लावणे आवश्यक होते. परंतु, बिल्डरने त्या ठिकाणी छोटे पत्रे लावले होते. दुसऱ्याच दिवशी काम सुरु असलेल्या बाजुला सिमेंट काँक्रिटचा बनवलेला रस्ता अचानक खचला. यामध्ये नाल्याचे आणि रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सदरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आता घटना घडून एक महिना होत आला तरी संबंधित दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेे पोलीस आणि महापालिका प्रशासन दोषींना पाठीशी घालत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
महापालिकेने बिल्डरला खुलासा करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. तसेच महापालिकेकडून रस्त्याचे किती नुकसान झाले याचा अहवाल अभियंताना तयार करण्यास सांगितले आहे.
-राधाबिनोद शर्मा, आयुक्त-मीरा भाईंदर महापालिका.
याप्रकरणी कोणाचीही तक्रार न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
-नवघर पोलीस ठाणे.