संततधार पावसाने पाणी उपसा कंत्राटदारांच्या कारभाराची पोलखोल

नवी मुंबई : मागील तीन-चार दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरात सर्वत्रच रस्ते जलमय होण्याबरोबरच ठिक-ठिकाणी पाणी देखील तासनतास साचून राहिल्याने नवी मुंबई शहरात साचलेले पाणी उपसा करण्याचा ठेका घेतलेल्या विविध कंत्राटदारांचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे, असे निदर्शनास आणून, ‘पाणी उपसा कामांच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करुन संगनमताने नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदार तसेच संबंधित विभागातील अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करावी', अशी मागणी ‘भाजपा कामगार मोर्चा'चे कोकण विभाग उपाध्यक्ष सुधीर गोरखनाथ पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून धो-धो बरसलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील सर्वच रस्ते जलमय झाले तसेच अनेक ठिकाणी तासनतास पाणी साचून राहिले. त्यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना  त्रास सहन करावा लागला, लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार बरसलेल्या मुसळधार पावसाने महापालिका अभियंता विभागातील आणखी एका भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे, असे सुधीर पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.

नवी मुंबई महापालिका  अभियंता विभागाकडून पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागात पंपाद्वारे साचलेले पाणी काढण्याचे काम विविध कंत्राटदारांना देण्यात आले आहे. परंतु, या वेळेस मान्सूनचा जोर ओसरल्यावर प्रत्येक कंत्राटदार निश्चिंत झाला असताना आणि आता कामाचे फुकटचे देयक मिळण्याच्या आनंदात असताना अचानक झालेल्या संततधार मुसळधार पावसाने कंत्राटदाराच्या कामाच्या भ्रष्टाचाराची आणि कामचुकारपणाची प्रचीती नवी मुंबईतील नागरीकांना आली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरीक आणि वाहन चालक पंपाद्वारे पाण्याचा उपसा करणारे कंत्राटदार, त्यांची यंत्र सामग्री, लावण्यात येणारे पंप आणि संबंधीत जबाबदार अभियंत्यांचा त्या-त्या ठिकाणी शोध घेत आहेत, असे निवेदनात नमूद करुन, ‘महापालिका क्षेत्रातील बेलापूर ते दिघा विभाग कार्यालय पर्यंतच्या संबंधित प्रत्येक पाणी उपसा कामाची, कंत्राटदारांची, पाणी साठल्याच्या ठिकाणांची तसेच संबंधित कंत्राटदारांकडून पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आलेल्या कामाची माहिती घ्यावी, त्या-त्या दिवसाचे, वेळेचे, ठिकाणाचा अभियंत्यांकडून लेखी अहवाल तसेच स्थळ दर्शक जीपीएस फोटो घ्यावेत', अशी मागणी सुधीर पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिका क्षेत्रातील पावसाळी पाणी उपसा कामांच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करुन, अधिकारी वर्गाच्या संगनमताने महापालिकेला चुना लावून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या कंत्राटदार तसेच संबंधित विभागातील अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आपण महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या मागणीची पूर्तता झाली तर भ्रष्ट कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी वर्गाला जरब बसण्याबरोबरच नवी मुंबईतील नागरिकांच्या पैशाची उधळण थांबणार आहे.- सुधीर गोरखनाथ पाटील, उपाध्यक्ष - कोकण विभाग, भाजपा कामगार मोर्चा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नालेसफाईचे कोट्यवधी गेले वाहून