सीवूड्स येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने खळबळ;
नवी मुंबई : सीवूड्स येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल अज्ञात व्यक्तीने शाळेला पाठविल्याने सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी शाळेतील सर्व मुलांना बाहेर काढुन बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉडच्या मदतीने संपुर्ण शाळेची तपासणी केली. मात्र तपासणीत शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तु आढळुन आली नाही. त्यामुळे बॉम्बची धमकी खोटी असल्याचे व अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी व शाळेने स्टुकेचा निश्वास टाकला.
सीवूड्स येथील दिल्ली पब्लिक स्कुलसह इतर काही शाळेंमध्ये बॉम्ब ठेवल्याचा इमेल एका अज्ञात व्यक्तीने सोमवारी दिल्ली पब्लिक स्कुलच्या ईमेलवर पाठवून दिला. शाळा प्रशासनाने या ईमेलची तत्काळ दखल घेऊन त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील शाळेमध्ये धाव घेऊन शाळेतील सर्व मुलांना मैदानात बसवले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉडने संपुर्ण शाळेचा परिसर दोन तास पिंजुन काढला. मात्र पोलिसांना शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तु आढळुन आली नाही. त्यामुळे शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी खोटी असल्याचे व ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
बॉम्बची धमकी देणाऱया अज्ञात व्यक्तीविरोधातत शाळेने पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.